मांडणी नवीन राजकारणाची आणि निमित्त यशवंतराव गडाखांच्या अमृत महोत्सवाचे ! - Nagar Politics Yashwantrao Gadakh | Politics Marathi News - Sarkarnama

मांडणी नवीन राजकारणाची आणि निमित्त यशवंतराव गडाखांच्या अमृत महोत्सवाचे !

संदीप नवले : सरकारनामा
शनिवार, 13 जानेवारी 2018

"पूर्वी स्व. मारूतवार घुले पाटील व मी सामजंस्याने एकत्र मिळून समाजकारण केले. राजकारणात प्रमोशन नसते. 
तर दर पाच वर्षानी राजकीय व्यक्तीला समाजासमोर परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे प्रत्येकवेळी सत्ता मिळेल असे नाही. "

नगर : नेवासा तालुक्यातील क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे मार्गदर्शक यशवंतराव गडाख यांनी राजकीय क्षेत्रात पन्नास वर्षे आणि  ७५ व्या वर्षातपदार्पण केले आहे.

त्याबद्दल नेवासा तालुक्यातील गावागावात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाला विरोधातील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनच्या कार्यकर्त्याचा पुढाकार दिसून येतो.

त्यामुळे हे कार्यकर्ते येत्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा झेंडा खाद्यावर घेणार असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.  

सध्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या बालेकिल्यातील भेंडा, कुकाणा, देडगाव अशा विविध गावांमध्ये यशवंतराव गडाख यांचा अमृत महोत्सवानिमित्त जोरदार कार्यक्रमाचा धडाका सुरू आहे.

या कार्यक्रमाला भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे,  राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांची उपस्थित दिसत नाही. 

मात्र, राष्ट्रवादीचे माजी आमदार पाडुरंग अभंग यांची उपस्थिती दिसून येते. दुसरीकडे यशवंतराव गडाखांचे सुपुत्र माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नुकतेच राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून कांतीकारी शेतकरी पक्षाची वेगळी चूल मांडली.

त्याला मार्गदर्शक म्हणून यशवंतराव गडाख काम करतात. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन क्रांतीकारी पक्षाने प्रत्येक गावात कार्यकर्ते तयार केले. मात्र, यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सवाचे निमित्त करून गावांगावात हे अमृतमहोत्सव साजरे केले जात आहे. 

गावपातळीवर कांतीकारी शेतकरी पक्षाचे कार्यकर्त्याकडून महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. त्यात आपलाही सहभाग असावा म्हणून गावातील संबधामुळे विरोधातील ज्येष्ठ कार्यकर्ते पुढाकार घेत कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित आहेत. त्यामुळे तरूण कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून तालुक्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे मताचे की सत्तेचे राजकारण चालू आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

नेवासा (जि.नगर) तालुक्यातील भेंडा खुर्द आणि बुद्रक या दोन्ही गावांच्या वतीने  यशवंतराव गडाखांच्या अमृतमहोत्सवाचेआयोजन करण्यात आले होते . हा अमृत महोत्सव शनिवारी (ता.१३) भेंडा बुद्रक येथील नागेश्वर मंदिर येथे साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार पाडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दत्तुभाऊ, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे,

ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक अशोक मिसाळ, राष्ट्रवादीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डाँ. शिवाजी शिंदे, शिवसेना शाखाप्रमुख संजय मिसाळ यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.  

यावेळी खा. यशवंतराव गडाख म्हणाले, "राजकारणात नेहमी विरोधाकांना द्वेषाने पाहू नये. लोकशाहीत निवडणुका चालू राहतात. राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी शहरातील बुद्धीवंताची फार वाईट आहे."

"पूर्वी स्व. मारूतवार घुले पाटील व मी सामजंस्याने एकत्र मिळून समाजकारण केले. राजकारणात प्रमोशन नसते. 
तर दर पाच वर्षानी राजकीय व्यक्तीला समाजासमोर परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे प्रत्येकवेळी सत्ता मिळेल असे नाही. "

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख