Nagar politics : fight for supremacy | Sarkarnama

नगर:  विखे- थोरात आणि शिंदे - पवार  संघर्षाकडे राज्याचे लक्ष्य 

ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

विखे यांनी विधानसभेला जिल्ह्यात बारा विरुद्ध शून्य असा निकाल लागेल, असे जाहीर केले आहे . थोरातांनीही विखे यांच्यामाध्यमातून जिल्ह्यात उधळू पाहणारा भाजपचा वारू थोपविण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे.  

नगर : राधाकृष्ण विखे पाटील  - बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांच्या अनुक्रमे शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात संपर्क वाढविला. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना चितपट करण्याचा चंग दोघांनीही बांधला आहे. त्यामुळे थोरात यांच्या या शिर्डीतील कार्यक्रमांना लाभत असलेली उपस्थिती आणि संगमनेरमध्ये विखे यांच्या सुरू झालेल्या चकरा आणि चहापानांचे कार्यक्रम दोन्ही मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय आहे.

संगमनेरमध्ये बाळासाहेब  थोरातांविरुद्ध राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील लढणार अशी राजकीय वर्तुळात चारचा आहे . तर  राधाकृष्ण विखेंविरोधात थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे उभे राहणार असल्याचा दावा थोरात समर्थक करीत आहेत . या  चर्चेने शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकसभेला नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन कॉंग्रेस नेत्यांमधील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर थोरातांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. विखे पाटील यांनी भाजपशी सोयरिक केली. त्यांना मंत्रीपदही मिळाले.

त्यानंतर विखे यांनी विधानसभेला जिल्ह्यात बारा विरुद्ध शून्य असा निकाल लागेल, असे जाहीर केले. थोरातांनीही विखे यांच्यामाध्यमातून जिल्ह्यात उधळू पाहणारा भाजपचा वारू थोपविण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे.  

शिंदे - पवार सामना  गाजणार

कर्जत-जामखेड मतदारसंघातील या वेळच्या निवडणुकीत  पालकमंत्री राम शिंदे आणि युवा नेते रोहित पवार यांच्यातील संभाव्य सामना राज्यभर गाजणार आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणारे फलक शिंदेंनी गावोगावी लावलेत. पवार यांनीही वर्षभरापासून नियमित संपर्क आणि विकासकामांचा सपाटा लावलाय. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीचा "फिव्हर' चांगलाच आहे.  

नगरमध्ये शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात या वेळीही सामना होईल. गेल्या वेळी युती न झाल्याने राठोड यांचा पराभव झाला. आता युती होण्याची आशा पल्लवीत झाल्याने राठोड यांच्या अपेक्षा उंचावल्यात. जगताप यांनीही सहा महिन्यांपासून भाजप- शिवसेना युतीशी सामना करण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.

राहुरीत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्यातील सामना चांगलाच रंगणार आहे. परंतु विखे पाटील यांची "मर्जी' कोण संपादन करील, यावर बरेच अवलंबून आहे.

शेवगाव-पाथर्डीमध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचा सामना करण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे नेते ऍड. प्रताप ढाकणे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह इतर नेते तयारीत आहेत. ऐनवेळी या तिघांसह विरोधकांमध्ये किती एकी राहील, यावरच निवडणुकीची रंगत ठरणार आहे. राजळे यांच्यासाठी स्वतः मंत्री पंकजा मुंडे पुढे सरसावणार आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

श्रीगोंदा हा  या तिन्ही मतदारसंघांखालोखाल 'हॉट' मतदारसंघ  आहे. तेथे गेल्या वेळी अकरा वर्षे मंत्री व सहा वेळा आमदार असलेल्या बबनराव पाचपुते यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने पराभूत केले होते. आता पाचपुते यांनीही भाजपच्या माध्यमातून बांधणी चालविली आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आमदार होण्याचा चंग बांधला आहे. राहुल जगताप यांनीही विजयासाठीचे आडाखे बांधले नसतील तर नवलच.

पारनेरमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष व शिवसेना नेते विजय औटी केवळ विकासकामांच्या बळावर सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्याची तयारी करीत आहेत. नव्याने राष्ट्रवादीत आलेले नीलेश लंके व बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना किती साथ मिळते आणि सुजित झावरे यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते, यावरच तेथील निकाल राहील.

अकोल्यात आमदार वैभव पिचड यांनी 'काळा'ची पावले ओळखून गेल्या 40 वर्षांचा शरद पवार यांचा व 'राष्ट्रवादी'चा घरोबा तोडून हातात कमळ घेतले. पिचड यांना विजयाची खात्री असून, अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे यांच्यासह इतर विरोधक पिचडांच्या भाजप प्रवेशाची 'रिऍक्‍शन' कशी येईल, यादृष्टीने प्रयत्नशील असणे स्वाभाविक आहे. 
 
कोपरगावात भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांच्यातील संघर्ष या वेळीही रंगणार आहे. विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोपरगावची निवडणूकही लक्षवेधी ठरेल. 

 श्रीरामपूर (राखीव) मतदारसंघात आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा सामना कोणाशी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. या मतदारसंघात उमेदवारांची अचानक भाऊगर्दी होत आहे.

नेवासे मतदारसंघात शंकरराव गडाख यांच्या भाजप व शिवसेना प्रवेशाची चर्चा झडत आहे. परंतु गडाख यांनी मात्र आपण अध्यक्ष असलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातूनच लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखांविरोधात तयारी चालविली असून, त्यांना स्वपक्षातच संघर्षाचा सामना करावा लागतोय. त्यावर ते कशी मात करतात, विखे पाटील यांना किती "मदत' करतात, यावरही बरेच अवलंबून आहे. राष्ट्रवादीतर्फे पांडुरंग अभंग किंवा विठ्ठल लंघे हेही नेवाश्‍याच्या रिंगणात उतरणार असल्याने लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

नगर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. त्यापैकी पाच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. विखे पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढेल, असे वातावरण भाजपच्या गोटात आहे. थोरातांनीही गेल्या वेळेपेक्षा पक्षाची ताकद वाढविण्याची तयारी चालवली आहे.

शिवसेनाही एकवरून पुढे सरकण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदार वैभव पिचड यांनी 'झटका' दिल्याने आता राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोनच आमदार उरले आहेत. सध्याची स्थिती पाहता राष्ट्रवादीची आहे ती ताकद राहील की नाही, याबाबत साशंकताच आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख