Nagar news - congress district president election | Sarkarnama

नगरमध्ये कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष थोरात की विखे गटाचा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

महिनाअखेरपर्यंत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेस अंतर्गत असलेली गटबाजी पाहता हे पद विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाकडे जाते, की ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाला संधी मिळते, हे काळच ठरविणार आहे.

नगर : महिनाअखेरपर्यंत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेस अंतर्गत असलेली गटबाजी पाहता हे पद विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाकडे जाते, की ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाला संधी मिळते, हे काळच ठरविणार आहे. थोरात गटाकडून आमदार डॉ. सुधीर तांबे व राजेंद्र नागवडे हे दावेदार आहेत. विखे गटाकडून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची नावे चर्चेत आहेत.

विखे गटाकडून म्हस्के की शेलार
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या कारकिर्दीत पक्षाकडून विशेष कामे झाले नसल्याचा सूर पक्षांतर्गत निघत होता. परंतु विखे सांगतील तीच पूर्व दिशा होत असल्याने ससाणे यांचेही काही चालत नसल्याच्या वावड्याही कार्यकर्त्यांमधून सुरू होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील म्हणजेच कॉंग्रेस असे चित्र निर्माण झाले. विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपदच असल्याने असे चित्र निर्माण होणे साहजिकच असले, तरी मध्यंतरी विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी मैत्री व मध्यंतरी भाजपमध्ये जाण्याचा लागलेला सूर, यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते विखे पाटील यांचीच मनधरणी करीत त्यांच्या गटाच्या पारड्यात या पदाची माळ टाकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विखे पाटील गटाचे म्हस्के व शेलार यांचे भवितव्य विखे यांच्यावरील कॉंग्रेसच्या कृपेवरच अवलंबून आहे, असे म्हणावे लागेल.

थोरात गटाकडून नागवडे की तांबे
थोरात व विखे गटाचे राजकीय विरोध अजूनही संपलेला नाही. उलट त्याला अधूनमधून फोडणी दिला जात आहे. आमदार थोरात यांना गुजरात राज्याची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे अधिकार देऊन पक्षाने थोरात यांचा सन्मान केलेला दिसतो. थोरात यांच्यावर कॉंग्रेस मेहेरबान असले, तरी त्यांचा वरिष्ठपातळीवर असलेल्या संपर्क कमी पडू नये, यासाठी त्यांनीही काळजी घेतलेली दिसते. थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिल्यास नगरमध्ये विधानसभेसाठी त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांना उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ही संधी तांबे सोडणार नाहीत, अशी शक्यता गृहित धरली, तर थोरत गटाचे राजेंद्र नागवडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची माळ जाऊ शकते. तसेही राजेंद्र नागवडे यांची श्रीगोंदे तालुक्यात असलेली सरसी आणि भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते व राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांना तोंड देण्यासाठी नागवडे यांना ताकद देण्याची गरज आहे. श्रीगोंदे विधानसभेसाठी कॉंग्रेसला गड ताब्यात घ्यायचा असेल, तर राजेंद नागवडे यांना हे पद मिळणे संयुक्तीक ठरेल, असा सूर कॉंग्रेसमधून येऊ लागला आहे. त्यामुळे थोरात गटाकडून शेवटी नाव कोणाचे द्यायचे, हे थोरात ठरविणार असल्याने त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

देशमुख यांना गुंतवून ब्रेक लावणार का?

कॉंग्रेसचे राज्याचे सरचिटणीस विनायक देशमुख हेही जिल्हाध्यक्षपदाचे दावेदार आहेत. ते सध्या दोन्ही गटाचे नसून तटस्थ आहेत. त्यांचा कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी असलेला संपर्क पाहता त्यांच्याकडे या पदाची सुत्रे देण्याबाबत विचार होऊ शकतो. दोन्ही गटांमधील नियोजित उमेदवार हे आगामी काळात विधानसभेचे उमेदवार असतील. प्रत्येकाचा कल आपापल्या मतदारसंघात असेल. देशमुख मात्र विधानसभा लढविण्याची शक्यता अद्यापतरी दिसत नाही. या पार्शभूमीवर पक्षाचे काम ते अधिक चांगले करू शकतील, असा वरिष्ठांचा व्होरा असला, तरी राज्याचे सरचिटणीसपदावर जाऊन पुन्हा जिल्हापातळीवर ते काम करण्यास तयार होतील का, असा प्रश्न आहे. त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांना स्थानिक पातळीवर गुंतवून ठेवून त्यांच्या वरिष्ठस्तरावरील कारकीर्दीला ब्रेक लावण्याचे कामही जिल्ह्यातील काही मंडळी करू शकतात, अशी शंकाही उपस्थित होत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख