नगर महापालिकेतील गैरव्यवहारावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून दोन प्रभागांत हायमॅक्स बसविल्याचे भासवून चाळीस लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. प्रारंभी अधिकाऱ्यांना महासभेतून हाकलून देत नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली. मात्र, हा वाद आता सत्ताधिकारी व विरोधी पक्षांपर्यंत गेला आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ठेकेदाराला पाठिशी घातल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केला. तर त्याचे खंडण आमदार जगताप यांनी करीत अपयश झाकण्यासाठी शिवसेनेची धडपड असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकमेकांसोबत हातात हात घालणारे आजी-माजी आमदार आता एकमेकांवर तुटून पडले आहेत.
नगर महापालिकेतील गैरव्यवहारावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

नगर : महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून दोन प्रभागांत हायमॅक्स बसविल्याचे भासवून चाळीस लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. प्रारंभी अधिकाऱ्यांना महासभेतून हाकलून देत नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली. मात्र, हा वाद आता सत्ताधिकारी व विरोधी पक्षांपर्यंत गेला आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ठेकेदाराला पाठिशी घातल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केला. तर त्याचे खंडण आमदार जगताप यांनी करीत अपयश झाकण्यासाठी शिवसेनेची धडपड असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकमेकांसोबत हातात हात घालणारे आजी-माजी आमदार आता एकमेकांवर तुटून पडले आहेत.

नगर महापालिकेतील दोन प्रभागांमध्ये हायमॅक्स दिवे बसविल्याचे भासवून बिले मंजूर करून चाळीस लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पालिकेच्या सभेत पुराव्यानिशी केला. संबंधित फाईल गायब असून, रजिस्टरला नोंदी नाहीत. बिलांवर अधिकाऱ्यांच्याच बनावट सह्या आहेत, हे बोराटे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनीही ही सही आपली नसून, कुणी केली याबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून रणकंद होऊन महापालिकेच्या विशेष सभेत मोठा गदारोळ झाला. गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या सहा अधिकाऱ्यांना सभेतून बाहेर काढण्यात आले. या गदारोळामुळे सभा तहकूब करून पुन्हा घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.

राष्ट्रवादी - शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप
महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून, महापौर सुरेखा कदम आहेत. तर नगर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आमदार महापालिकेमध्ये लुडबूड करतात, असा आरोप यापूर्वी अनेकदा झाला होता. याबाबत सुंदोपसुंदी सुरूच होती. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार जगताप व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी एकमेकांच्या हातात हात घालून फोटोसेशनही केले होते. शहराच्या विकासासाठी आपण एकत्र आहोत, अशी टिपण्णीही केली होती. मात्र, महापालिकेतील ठेकेदाराकडून झालेल्या गैरव्यवहारावरून माशी शिंकली. मागील आठवड्यात गळ्यात गळा घातलेले आजी-माजी आमदार आता एकमेकांवर आरोप करून तुटून पडले आहेत.

आमदारांच्या आर्शीर्वादाने मनपावर दरोडा - अनिल राठोड
महापालिकेतील गैरव्यवहार हा स्थानिक आमदारांच्या आशीर्वादानेच झाला आहे. ठेकेदाराने ४० लाखाचा घातलेला हा दरोडा आहे. हा गैरव्यवहार केवळ चाळीस लाखाचा नसून इतर कामांची चौकशी झाल्यास चार ते पाच कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येणार आहे. यासाठी आपण पोलीस अधिक्षकांना भेटणार आहोत. त्यामुळे या प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील बसविलेले हायमॅक्स दिवे तीन-चार महिन्यात खराब झाले कसे. संबंधित बल्ब चायना कंपनीचे आहेत, की कसे याबाबत आता सखोल चौकशीची मागणी करणार आहोत. महापालिकेतील गैरव्यवहाराची भांडाफोड झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या चौकशीत आमदार खोडा घालतात. या प्रकरणात कॅफो व इतर अधिकाऱ्यांना दम कोणी दिला, याची चौकशी होण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या दबावामुळेच ठेकेदार मोकाट आहेत, असाही आरोप राठोड यांनी केला.

गैरव्यवहारामुळे शिवसेनेचे अपयश उघड - आमदार जगताप
महापालिकेतील झालेला गैरव्यवहार हे शिवसेनेचे अपयश आहे. शिवसेनेची सत्ता असताना मी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव कसा आणणार. अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. माजी आमदार अनिल राठोड यांनी पथदिव्यांच्या चौकशीत आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझा संबंध असता, तर या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असती का, असे आरोपाचे खंडण करून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवेसनेवर पलटवार केला.

बजेट रजिस्टर बांधकाम विभागात असणे अपेक्षित असताना ते महापौरांच्या कार्यालयात गेले कसे, ते अजूनही कोणाला दिसत कसे नाही. सभेते आणलेले रजिस्टर कोणते होते, असे अनेक प्रश्न या प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यामुळे महापालिकेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यानंतरच खरे काय ते बाहेर येईल. राष्ट्रवादी काँग्रेसने गैरव्यवहार केला, हा राठोड यांचा आरोप चुकीचा असून, त्यांनी आधी स्वतःच्या सत्तेतील महापालिकेला सुधारावे, अशी टीका आमदार जगताप यांनी केली. संबंधित ठेकेदार सचिन लोटके राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. तसे असल्याचे त्यांनी नियुक्तीपत्र दाखवावे, असे आव्हान आमदार जगताप यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com