दूधदर प्रश्‍नाची बैठक आंदोलकांनी टाळली 

दूधदरवाढीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारने तोंडी दिलेल्या निरोपाला शेतकरी संघर्ष समितीने ठेंगा दाखवला आहे.
दूधदर प्रश्‍नाची बैठक आंदोलकांनी टाळली 

नगरः दूधदरवाढीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारने तोंडी दिलेल्या निरोपाला शेतकरी संघर्ष समितीने ठेंगा दाखवला आहे. 

दूध दरवाढीसाठी राज्यभर सध्या आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला जात आहे. शेतकरी दुधाने आंघोळ करून सरकारचा निषेध करीत आहेत. तर सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत दूध वाटप करून गांधिगिरीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी काल (रविवारी) सायंकाळी सहाच्या दरम्यान सरकारच्या वतीने गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांना निरोप दिला. दूध प्रश्न चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी दोन वाजता चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. परंतु रात्रीतून नियोजन करणे, इतर पदाधिकाऱ्यांना बोलावणे शक्‍य नव्हते. तसेच यापूर्वीचा सरकारचा अनुभव पाहता गोड बोलून वाटे लावतील. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहतील, यामुळे संघर्ष समितीने आजच्या बैठकिला ठेंगा दाखवित जाणे टाळले. 

वाढलेला वाहतूक खर्च, पशुखाद्याचे वाढलेले दर, चाऱ्याची टंचाई या सर्व पार्श्वभूमीवर कमी दरात दूध विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतीला पुरक उद्योग म्हणून दूध व्यावसायाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दुध दरवाढ करणे, हाच पर्याय आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून ठोस व योग्य प्रस्ताव दिल्याशिवाय बैठकिला जाणार नसल्याची भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. 

दूध दराबाबत चर्चा करण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती तयार आहे, मात्र सरकारने योग्य प्रस्ताव दिला पाहिजे. तसेच सरकारतर्फे अधिकृत निरोप देवून पदाधिकाऱ्यांना बोलवावे. योग्य प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते, हा अनुभव पाहता समितीने हा निर्णय घेतला असून, मंत्रालयातील आजच्या बैठकिला टाळले. तसेच शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नांबाबतच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com