nagar corporation kept eyes on twenty five thousand houses | Sarkarnama

नगरमधील अडीच हजार घरे रडारवर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

मायकलवार म्हणाले, मी महापालिकेत येऊन एक आठवडा झाला आहे. त्यामुळे अजून नगर शहराची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे मला सर्वांच्या सहकार्य़ाची आवश्यकता आहे.

नगर : शहरात कोरोना विषाणुचे तीन रुग्ण आढळून आलेले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अडीच हजार घरांवर महापालिकेची आठ पथके लक्ष ठेवून आहेत. या आठ पथकांसाठी महापालिकेकडे पुरेसी वाहने नसल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहनांची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य नाही. नागरिकांनी या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक अंतर ठेवावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

या वेळी महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे उपस्थित होते.
मायकलवार म्हणाले, मी महापालिकेत येऊन एक आठवडा झाला आहे. त्यामुळे अजून नगर शहराची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे मला सर्वांच्या सहकार्य़ाची आवश्यकता आहे. नगर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. यातील तिसरा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या 23 जणांच्या तपासणीचा अहवाल उद्या मिळेल. शहरात आढळलेले तीन रुग्ण व त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती, असे सुमारे अडीच हजार घरांवर महापालिका लक्ष ठेवून आहे. त्यासाठी महापालिकेने आठ पथके नियुक्त केली आहेत. यातील प्रत्येक पथकात एक डॉक्टर व चार परिचारिका आहेत. झोपडपट्टीसाठी वेगळे  पथक नेमण्याचा विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

रिकाम्या भूखंडात मिळणार भाजी
शहरातील महापालिकेच्या रिकाम्या भूखंडात भाजीवाल्यांसाठी जागा देण्यात येणार आहे. या भाजीवाल्यांना व ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याची ताकीद देण्यात येणार आहे. नगर शहरातील सर्व प्रभागांत अशा पद्धतीने भाजीवाल्यांसाठी जागा देण्याचा विचार सुरू आहे.

शहरातील किरकोळ दुकानदारांचा माल संपत आलेला आहे. तसेच ठोक व्यापाऱ्यांना माल किरकोळ दुकानदारांपर्यंत पोहोचवता येत नाही, अशी माहिती ठोक व्यापाऱ्यांनी महापालिकेला दिली आहे. महापालिकेच्या पुढाकारातून आठवड्यातून दोनदा किरकोळ दुकानदारांना माल पोहोचवण्याची व्यवस्था करून देण्याचा विचार सुरू आहे. यावर उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संबंधितांशी चर्चा सुरू आहे.

महापालिकेकडून नगर शहरात सोडियम हायड्रोक्लोराइड औषधाची फवारणी करण्यात येत आहे. या यासाठी महापालिकेकडे पुरेशी वाहने नसल्यामुळे काही शेतकऱ्यांकडून औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर घेण्याचा विचार सुरू आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख