'राम शिंदेंचा वाढदिवस' मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचा ठरणार?  - nagar agri college issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

'राम शिंदेंचा वाढदिवस' मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचा ठरणार? 

मुरलीधर कराळे 
सोमवार, 22 जानेवारी 2018

राम शिंदेंची अतिघाई कशासाठी? 
हळगावच्या कृषि महाविद्यालयासाठी आतापर्यंत संबंधित विभागाचा प्रस्तावच नाही. वित्त व नियोजन विभागाची मान्यताही नाही, निधीची तरतूदही नाही. असे असताना सुमारे 42 कोटी खर्चाच्या या महाविद्यालयाची अतिघाई कशासाठी करण्यात आली, असे प्रश्न मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी विचारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. नागपूर अधिवेशन चालू असताना विधानभवनात 21 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित हळगावच्या महाविद्यालयाला मंजूरी घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे उदघाटनाची अतिघाई कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

नगर : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जतला कृषी महाविद्यालयाच्या उदघाटनाला बोलावून केलेले शक्तीप्रदर्शन शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्याही अंगलट येण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची पूर्तता न करता हळगावच्या कृषि महाविद्यालयाचे उदघाटन केलेच कसे, याबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते प्रा. तुकाराम दरेकर आहेत. 

हळगाव कृषि महाविद्यालयाची 5 जुलै 2016 रोजी दिलेली परवानगी रद्द करून श्रीगोंदे आणि हळगाव या दोन प्रस्तावांची नव्याने छाननी करून त्यामधील उच्च गुणवत्तेचा प्रस्ताव मंजूर करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. या आदेशाची पूर्तता न करता पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या आग्रहास्तव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जानेवारी 2018 रोजी हळगाव येथे कृषि महाविद्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला. त्यामुळे श्रीगोंद्याच्या कृषि महाविद्यालयाचा निर्णय तातडीने न घेतल्यास मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे प्रा. दरेकर यांनी म्हटले आहे. कृषि महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रीया परिपूर्ण नसल्याने सदरच्या प्रस्तावावर अंतिम मान्यतेची सही करण्याचे धाडस प्रशासकीय अधिकारी करीत नाहीत. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना डावलून, कायद्याच्या तरतूदी डावलून आणि श्रीगोंदे कृषि महाविद्यालय डावलून निर्णय घेतल्यास सर्व संबंधितांवर न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली जाईल, असेही दरेकर म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख