नगरच्या महापौरांकडून 6 अधिकारी निलंबित; मात्र अंमलबजावणी होणार कां? 

नगरच्या महापौरांकडून 6 अधिकारी निलंबित; मात्र अंमलबजावणी होणार कां? 

नगर : नगर महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून पथदिव्यांची कामे झाल्याचे भासवून तब्बल पन्नास लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज सभेत संबंधीत अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी गदारोळ करून बाहेर हाकलले. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याची घोषणा महापौर सुरेखा कदम यांनी केली. 

उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, मुख्य लेखा अधिकारी दिलीप झिरपत, शहर अभियंता विलास सोनटक्के, उप अभियंता बाळासाहेब सावळे, विभागप्रमुख जितेंद्र सारसर यांना निलंबित करण्यात आले. 

महापालिकेच्या विकासभारामधील लेखाशीर्षातून प्रभाग क्र.28 व एक या दोन प्रभागांमध्ये वीस ठिकाणी ट्युबलर पोलवर पथदिव्यांची कामे झाल्याचे भासवून पन्नास लाखांचा अपहार केल्याचा आरोप बोराटे यांनी स्थायी समितीच्या सभेत काल केला होता. याबाबतचे पुरावे सादर करताना त्यांनी लेखाधिकारी, शहर अभियंता, विद्युत विभागप्रमुखांसह अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या कामाची विकासभार रजिस्टरला नोंद नसल्याचेही उघडकीस आणले. प्रोसेस माहिती नसल्याचे सांगून प्रभारी प्रशासकीय प्रमुख उपायुक्त विक्रम दराडे यांनी हतबलता दर्शविली असली, तरी त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत खातेनिहाय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश सभापती सुवर्णा जाधव यांनी दिले होते. त्यामुळे या सह्या कोणी व कोणाच्या इशाऱ्यावर केल्या, हे उघड होणार आहे. याबाबत आज पुन्हा सभा बोलाविण्यात आली होती. 

दरम्यान, आरोप असलेल्या बिल मंजुरीच्या प्रस्तावावर बोगस सह्यांच्या मुद्यावर मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांनी सभागृहात आपली भूमिका मांडून या सह्या माझ्या नाहीत, असे स्पष्ट सांगितले होते. स्टेशन रस्ता भागातील मल्हार चौकामध्ये कागदोपत्री दाखविलेल्या विद्युतीकरणाच्या कामाच्या बिल प्रस्तावावर माझ्या नावाची बनावट सही दिसते. ज्या दिवशी सही झाली, त्या दिवशी आपण आजारी रजेवर होते, असे सांगून खरात यांनी कालच्या सभेत वेळ मारून नेली होती.आज मात्र विरोधी नगरसेवकांनी काहीही ऐकून घेतले नाही. सुरुवातीपासूनच सभेत गोंधळ उडवून संबंधित अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास भाग पाडले. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ही सभा अखेर तहकूब करून बुधवारी घेण्याचे ठरले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com