भाजपात असंतोषाचे वारे : नागपूर महापालिकेतही नगरसेवक नाराज

विदर्भात आता भाजपाच्या गडात असंतोषाचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. आतापर्यंत खासदार-आमदारांपर्यंत असलेली नाराजी आता नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. नागपुरातील नगरसेवक आता पक्षनेत्यांविरुद्ध बंड पुकारण्याच्या स्थितीत आहेत.
भाजपात असंतोषाचे वारे : नागपूर महापालिकेतही नगरसेवक नाराज

नागपूर : विदर्भात आता भाजपाच्या गडात असंतोषाचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. आतापर्यंत खासदार-आमदारांपर्यंत असलेली नाराजी आता नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. नागपुरातील नगरसेवक आता पक्षनेत्यांविरुद्ध बंड पुकारण्याच्या स्थितीत आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भातून भरभरून माप मिळाले होते. विदर्भात भाजपने सहा लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. हे सहा उमेदवार निवडून आले म्हणजे यशाची टक्केवारी 100 होती. विधानसभा निवडणुकीत 62 पैकी 44 जागांवर आमदार निवडून आले. यशाची ही टक्केवारी 70 एवढी आहे. गेल्या वर्षी झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतही 145 पैकी 108 जागा पटकावून दोन तृतीयांश बहुमत मिळविले होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रामुख्याने भाजपात आलेल्या नेत्यांमध्ये असंतोष हळूहळू वाढू लागला. भाजप नेत्यांविरुद्ध थेट बोलण्याची हिंमत नाना पटोले यांनी केली. यानंतर आमदार आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तोफ डागली. असंतोषाचे वारे आता नागपूर महापालिकेपर्यंत पोहोचले आहेत. महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते संदीप जोशी यांच्या विरोधात प्रामुख्याने ही नाराजी आहे. नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल नाराजी नाही. त्यांनी सुरू केलेल्या विकास कामांना या नगरसेवकांचा पाठिंबाच आहे.

शिस्तीच्या नावावर भाजपच्या नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याचा 'हुकूम' संदीप जोशी यांनी काढला. यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरलेली असताना पक्षाच्या बैठकांना हजेरी लावत नसल्याच्या कारणावरून 42 नगरसेवकांना संदीप जोशी यांनी नोटीस बजावली आहे.

यात महापौर नंदा जिचकार यांचाही समावेश आहे. महापालिकेच्या कारभारात व नगरसेवकांवर वर्चस्व ठेवण्याच्या संदीप जोशी यांच्या नीतीमुळे नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने नाराजी आहे. भाजपच्या या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी त्वरित दूर न झाल्यास या असंतोषाची दखल मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांना घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com