भाजप अध्यक्षपदासाठी "निवडणूक' कार्यक्रम जाहीर, नड्डा 22 जानेवारीला सूत्रे स्वीकारणार

भाजप अध्यक्षपदासाठी "निवडणूक' कार्यक्रम जाहीर, नड्डा 22 जानेवारीला सूत्रे स्वीकारणार

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला. त्यानुसार सोमवारी (ता. 20) "निवडणूक' प्रक्रियेची औपचारीकता पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निश्‍चित केलेले कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांचे एकमेव नाव अध्यक्षपदासाठी असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणे निश्‍चित आहे. तो कार्यक्रम 22 जानेवारीला (बुधवारी) भाजप मुख्यालयात होईल. "सकाळ'ने याबाबतचे वृत्त याआधीच दिले आहे. 

स्वतंत्र भारताच्या इतिहासात सलग दोनदा स्पष्ट बहुमताने दिल्लीचे तख्त काबीज करणारा पहिला कॉंग्रेसेतर पक्ष असा विक्रम घडविलेला भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 11 कोटी सदस्यसंख्या असलेला जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्षही ठरला आहे. 2014 मध्ये पक्षाध्यक्ष झालेले अमित शहा यांच्याकडे 2019 च्या विजयानंतर मोदींनी क्रमाक 2 च्या गृहमंत्रीपदाची सूत्रे दिली. मात्र त्यामुळे शहा यांना पक्षाच्या जबाबदाऱ्यांना पूर्ण वेळ देता येणे अशक्‍य बनले. गृहमंत्रालयाचाही कारभार त्यांना अपेक्षित त्या गतीने चालविण्यात अडथळे येऊ लागल्याचे निदर्शनास आले. याचा फटका पक्षाला अनुक्रमे झारखंड व महाराष्ट्रातील सत्ता गमावणे व सीएए कायद्याच्या संभाव्य विरोधाची पुरेशी पूर्वकल्पना न येणे, या रूपाने बसला असे भाजप नेते मान्य करतात. 

परिणामी शहा यांच्याऐवजी नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्याचे दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी निश्‍चित केले. त्यानुसार नड्डा यांची नियुक्ती केली जाईल. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. त्याबाबत निवडणूक अधिकारी व माजी कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी आज सायंकाळी हा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत नड्डा (हेच) आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्या अर्जाची छाननी दुपारी 12.30 ते 1.30 या काळात होईल. त्यानंतरचा एक तास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आहे. जर दुसरे नाव ऐनवेळी आले तर 21 जानेवारीला सकाळी 10 ला निवडणुकीची प्रक्रिया केली जाईल मात्र ती शक्‍यता अजिबात दिसत नाही. त्यामुळे 22 जानेवारीला नड्डा यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com