मंत्री जयकुमार रावल भूमाफिया , माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन हडपली   - नवाब मलिक

नवाब मलिक यांचे आरोप खोटे अब्रुनुकसानीचा दावा करणार - जयकुमार रावलमुंबई : नवाब मलिक यांनी आपल्याविरुद्ध केलेले आरोप खोटे असू त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली .
malik---Raval
malik---Raval

मुंबई : "धुळे जिल्ह्याचे शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून हत्या आहे. जमिनीचा हव्यास असलेले मंत्री जयकुमार रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे.

रावल यांनी भारताचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांच्या नावे असलेली २७ एकर जमीन त्यांनी हडप केली आहे. त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे.

तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवल्यामुळे बावनकुळे यांचीही हकालपट्टी झाली पाहिजे, "अशी मागणी राष्टवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी केली.

एमआयडीसीची जागा हडप केल्याबद्दल माजी मंत्री खडसे यांची हकालपट्टी केली होती. त्याचप्रकारचे हे प्रकरण असल्यामुळे खडसेंचा न्याय रावल यांनाही मुख्यमंत्र्यांनी लावावा. खडसे प्रकरणात कुणाचेही प्राण गेले नव्हते. या प्रकरणात एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची दाहकता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

धुळे जिल्ह्यातील पालकमंत्री भूमाफिया आहेत. दोंडाईचाचे ते राजे असताना हजारो एकर जमीन त्यांच्याकडे होती. पण १९७६ साली लँड सीलिंग कायदा आल्यानंतर ५० एकरपेक्षा जास्त जमीन ग्रामीण भागात ठेवता येणार नाही, असा कायदा झाला. मात्र दोंडाईचा येथील रावल यांनी वेगवेगळे कुटुंब दाखवून ८०० एकर जमीन स्वतःच्या नावावर ठेवली आहे.

तसेच हजारो एकर जमीन कुत्र्या, मांजराच्याही नावावर दाखवून स्वतःकडे ठेवली. लँड सिलींग अॅक्टखाली त्यांची कुठलीही जमीन सरकारजमा झालेली नाही. इतका मोठा जमिनीचा साठा असतानाही त्यांची जमिनीची भूक संपलेली नाही. सरकारी प्रकल्प जिथे जिथे होतात, तिथे ते कवडीमोल दराने जमीन विकत घेऊन सरकारला वाढीव दरात विकतात, असे रोखठोक आरोप मलिक यांनी केले.

याआधी वाडी शेवाळे येथील प्रकल्पात त्यांची जमीन गेली नसतानाही त्यांनी २६ लाखांचा मोबदला घेतला. त्यानंतर २००६ साली नंदुरबार जिल्ह्यात ४ हेक्टर जमीन पंचरत्ना रावल या नावाने शेतकऱ्याकडून विकत घेतली. दोन लाखात विकत घेतलेल्या जमिनीला एक कोटी मोबदला मिळवला.

याचे पुरावे आमच्याकडे आहेत. या विषयांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे, एसीबी, धुळे एसपी यांच्याकडे केलेली आहे. एसीबी यांनी चौकशी सुरु केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली चौकशी थांबवण्यात आली. मुख्यमंत्री अजून किती शेतकऱ्यांचे बळी जाण्याची वाट पाहत आहेत, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

जयकुमार रावल यांचा परिवार, त्यांचे वडिल, बहिण पंचरत्ना या सर्वांचे कवडीमोल दराने जमीन विकत घेऊन ती लाटण्याचा या जिल्ह्यात उद्योगच आहे. त्यामुळे धर्मा पाटील यांना योग्य मोबदला न देता आणखी जमीन विकत घेता येते का या प्रकारातूनच धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले आहे.

रावल हे राजे परिवारातून असताना हजारो एकर जमीन असूनही दोन-चार एकरची जमीन हडप करण्याचे काम करत आहेत. एवढेच नाही तर रावल यांनी भारताचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांच्या नावे असलेली २७ एकर जमीन त्यांनी हडप केली आहे. कुठलीही कायदेशीर खरेदी न करता बळजबरीने त्यांनी जमिनीचा ताबा घेतलेला आहे.

रावल परिवार सामान्य शेतकऱ्यांची जमीन हडप करतायत, माजी राष्ट्रपतींचीही जमीन बळकावत आहेत. हे सरकार नक्की कोणत्या दिशेने जात आहे. मुख्यमंत्री या मंत्र्यांना वाचवत आहे. सरकारचा कारभार कसा चालू आहे, हे यातून दिसून येते, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

नवाब मलिक  यांच्यावर  अब्रुनुकसानीचा दावा करणार -रावल 


मुंबई : नवाब मलिक यांनी आपल्याविरुद्ध केलेले आरोप खोटे असू त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली .

. जयकुमार रावल म्हणाले , " नवाब मलिक यांनी कोणतीही खातरजमा न करता खालच्या पातळीवर जाऊन आपल्यावर आरोप केले असून त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com