my phone never unreachable as i always responds every call says adhalrao patil | Sarkarnama

`माझा फोन लागला नाही, असे कधीच होत नाही`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

आढळराव यांनी आपण नेहमीच जनतेच्या संपर्कात असल्याची ग्वाही दिली. 

शिक्रापूर : माझा फोन लागला नाही, असे कधीच होत नाही, असे सांगत आपण कायम जनतेच्या संपर्कात असल्याचे शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

युवासेनेचे शिरूरचे माजी तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला होता. गहू काढणीसाठी आलेल्या हार्वेस्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. पवार यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी थेट अजित पवारांनाच फोन लावायचे सुचविले. संजय यांनी तो फोन लावला. अजितदादांनी उचलला. डिझेलवाल्यांनी तो काॅल ऐकला आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आणि त्यांचे तब्बल दहा लाख रूपये वाचले. कारण डिझेल मिळत नसल्याच्या नावाखाली त्यांनी रेट फार वाढविले होते. ते डिझेल मिळाल्यानंतर कमी केले. अजितदादांना फोन करण्याआधी संजय पवार यांनी आढळरावांना फोन केला होता. पण काही कारणांमुळे तो लागू शकला नव्हता, असा उल्लेख `सरकारनामा`च्या बातमीत होता.

त्यावर सरकारनामाच्या फेसबुकवर खुद्द आढळराव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. 
``माफ करा, पण माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही, काहीतरी चुकतंय, संजयला खरोखरच मला फोन करायचा असता आणि तो लागला नसता तर नंतर सुद्धा त्याने मला फोन केला असता, मुळात माझा फोन सगळ्यांना नेहमी लागत असतो,``असे त्यांनी सांगितले.

सरकारनामा फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे

देविदास आढळराव पाटील 
दादाचा फोन न लागणे हे आज पहील्यांदाच ऐकतो. संपूर्ण शिरूर लोकसभेतील समस्त जनतेला हे माहीत आहे की दादाचा फोन कधीच बंद नसतो आणि बंद राहत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

आकाश मोर्डे
शिवाजीदादा हे सामान्य माणसांसाठी आधार आहेत. आजही हक्काने उपलब्ध होणारे ते एकमेव आहेत.विद्यमान लोकप्रतिनिधींपेक्षा लोकांचा आजही शिवाजीदादांवर भरवसा आहे. अजितदादाही त्यांच्या कामाच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. शिरूर मतदारसंघातील जनता शिवाजीदादांकडे अपेक्षेने पाहते आणि तेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहतात.

संजय पवार (ज्यांनी अजितदादांना फोन केला ते)
अजितदादाला मी स्वतः कॉल केलेला आहे. मी बोललो आहे. शेतकऱ्यांचे काम होते. ते अजितदादांनी केले. त्याबद्दल आभारी आहे. पण मी शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यासोबत 10 वर्षे झाले काम करतोय. आतापर्यंत मी दादांना 50 वेळा कॉल केला असेल. प्रत्येक कॉल दुसऱ्याच रिंगला घेतला आहे आणि ते काम तातडीने केले आहे. त्यामुळे आढळरावदादा सर्वसामान्यांसाठी एक नंबर माणूस आहे. हे सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे. कृपया विनंती आहे. आढळराव दादांच्या विषयी कोणीही अपप्रचार करु नये.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख