My Fitness Digvijay Bagal | Sarkarnama

माझा फिटनेस - रोजचे दोन तास फक्त व्यायामासाठीच

अण्णा काळे
गुरुवार, 18 मे 2017

सोलापूरच्या राजकारणातील प्रिन्स अशी ओळख असलेले दिग्विजय ऊर्फ प्रिन्स बागल राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व. अवघ्या 25 वर्षांचे असलेले प्रिन्स यांचे मसल्स आणि रुबाबदार शरीरयष्टी तरुणांना व्यायामाची प्रेरणा देऊन जाते. करमाळा तालुक्‍यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदाची जबाबदारी, करमाळ्यातील बागल गटाचे राजकारण हताळत असताना कितीही व्यापातून दररोजचे दोन तास व्यायामासाठी ठरलेलेच असतात.

प्रिन्स यांचे वडील माजीमंत्री दिगंबर बागल यांच्या अकाली निधनाने करमाळा तालुक्‍याच्या राजकारणाची जबाबदारी प्रिन्सच्या आई माजी आमदार श्‍यामल बागल यांच्यावर आली. राजकारणात आईला मदत करण्यासाठी प्रिन्स व त्यांच्या भगिनी रश्‍मी बागल-कोलते ही भावंडे मदत करतात. तालुक्‍यातील युवकांची फळी सांभाळण्याची जबाबदारी प्रिन्स यांच्यावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांमध्ये प्रिन्स यांचे वेगळे आकर्षण आहे.

मजबूत शरीर आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व. तरुण कार्यकर्त्यांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व प्रिन्स यांनी साकारले आहे. लहानपणापासून असलेली व्यायामाची आवड त्यांनी जोपासली आहे. काही दिवस जिममध्ये व्यायाम केल्यानंतर आता करमाळ्यातील घरातच त्यांनी अत्याधुनिक जीम बनवली आहे. कारडीओ, वेट ट्रेनिंग बायसेफ, ट्रायसेफ, चेस्ट अशा विविध प्रकारचा साधारणपणे दीड ते दोन तास व्यायाम करतात. याशिवाय किमान तीन तास जॉगिंग, वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट, व्हाॅलीबॉल, पोहणे या माध्यमातून फिटनेस कायम ठेवतात.

प्रिन्स यांनी शालेय जीवनापासूनच खेळाला आणि व्यायामाला अधिक महत्त्व दिले आहे. शालेय जीवनात त्यांनी वेगवेगळ्या खेळात सहभाग नोंदवला. पोहण्याच्या स्पर्धेतील बॅक स्ट्रोक प्रकारात त्यांना विभागीय पातळीवरील सिल्व्हर मॅडल मिळाले आहे. फ्री स्टाइल प्रकारात ब्रॉंझ पदक मिळवले आहे.

कसून केलेल्या मेहनतीचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या आत जेवण करण्याची त्यांची सवय आहे. नास्त्यापेक्षा जेवणावर अधिक भर असतो. पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, दूध, तूप, मांसाहारामध्ये, चिकन, मटण, मासे या प्रिन्स यांच्या आवडत्या डिश. फळे, दूध, ताक, दही यांचा जेवणात नियमित समावेश असतो. तालुक्‍याच्या राजकारणाचा व्याप आणि कार्यकर्त्यांची वर्दळ यामुळे प्रिन्स दिवसा झोपत नाहीत. दिवसातील आठ तासांची त्यांची झोप आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख