My family's worries were allayed because of you, the person's minister called Gadakh | Sarkarnama

तुमच्यामुळे माझ्या परिवाराची चिंता मिटली, त्या व्यक्तीचा मंत्री गडाखांना फोन

विनायक दरंदले
सोमवार, 27 एप्रिल 2020

चौधरी यांनी घरी सुखरुप पोचताच रविवारी रात्री नऊ वाजता मंत्री गडाख यांना फोन करुन आभार मानले. ``साहेब, खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने संपूर्ण परीवाराची चिंता मिटली. तुमच्यासारखी गोड माणसं पाहून बरं वाटलं. तुम्ही खरंच आमच्यासाठी देव आहात.``

सोनई : "आठ महिन्याच्या अवघडलेल्या पत्नीसह नेवाशात अडकून पडल्याने त्याच्या हातपायाचा थरकाप उडाला होता. भाऊ, वयस्कर आईसह नातेवाईक चिंतेत असताना एका मंत्र्याने आम्हाला थेट घरी पोहच केल्याने पुढाऱ्यातही देवमाणूस असल्याची अनुभूती आली," अशी भावना गोंदीया येथील योगेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.

सुपे (ता. पारनेर) येथे मोलमजूरी करत असलेले योगेंद्र चौधरी (रा. सडकर्जुनी, जि. गोंदिया) पत्नी राधिकासह नेवासे ग्रामीण रुग्णालयात सहा दिवसापासून अडकले होते. ही बाब जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना समजल्यानंतर त्यांनी सर्व शासकीय परवानग्या काढत गरोदर महिलेस घरापर्यंत पोचण्याची व्यवस्था केली. घररातून दोन वेळचा जेवणाचा डबा, कोरडा शिधा व खर्ची म्हणून रक्कम दिली होती.
चौधरी यांनी घरी सुखरुप पोचताच रविवारी रात्री नऊ वाजता मंत्री गडाख यांना फोन करुन आभार मानले. ``साहेब, खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने संपूर्ण परीवाराची चिंता मिटली. तुमच्यासारखी गोड माणसं पाहून बरं वाटलं. तुम्ही खरंच आमच्यासाठी देव आहात. तुमच्या कार्यकर्त्यांनी दिलेली माया आयुष्यभर विसरणार नाही,`` अशी भावना त्यांनी फोनवर व्यक्त केली.

गडाख यांनीही मदत नाही, तर कर्तव्य आहे माझे. असे उत्तर देवून वयस्कर आई मंचुराबाई, भाऊ छगनलाल, रविंद्र व गरोदर पत्नीची विचारपूस करत काळजी घ्या. काहीही गरज पडली, तर फोन करा, असा धीर दिला.
सडकर्जुनी गावाचे सरपंच व्यकंट चौधरी, पोलिस पाटील राजेंद्र कांबळे, गावातील आरोग्य पथक, आशासेविका ललीता येडे यांच्यासह ग्रामस्थांनी गावात पती-पत्नीचे स्वागत केले. प्रशासनाने या दोघास घरातच चौदा दिवस क्वारंटाइन ठेवले आहे. गडाखांनी आपलेपणातून केलेल्या कामाचे नगर, उस्मानाबाद व गोंदीया जिल्हात कौतुक होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून घेतली प्रेरणा
चौधरी यांच्याबरोबर फोनवर बोलताना मंत्री गडाख यांनी महाराष्ट्राला कोरोनातून सोडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रात्रंदिवस झटत असून, त्यांची प्रेरणा घेवून आम्ही मदत नव्हे, कर्तव्य पार पाडत असल्याचे सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख