थोरातांच्या संगमनेरमधून मुस्लिम युवकांचे सोनिया गांधींना पत्र : शिवसेना नको  

शिवसेनेसोबत आघाडी करण्याची कृती म्हणजे मुस्लिम समाजाची एक प्रकारे फसवणूकच असल्याची भावना या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आली आहे.
Balasaheb Thorat Soniya Gandhi
Balasaheb Thorat Soniya Gandhi

संगमनेर :राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेबरोबर आघाडी करु नये अशी मागणी मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची पदाधिकाऱ्यांची भाषा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूकच असून, काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जावून पक्षाचे नुकसान करुन घेवू नये, अशी कळकळीची विनंती या युवकांनी एका पत्राद्वारे केली आहे.


      माजी पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या 102व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मुस्लिम समाजातील या युवक कार्यकर्त्यांनी शहरातील इंदीरा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हे पत्र माध्यमांपुढे जाहीर केले.

श्रीमती सोनिया गांधी यांना पाठविलेल्या या पत्रामध्ये युवकांनी म्हटले आहे की, देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय वाटचालीत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ व पाठबळ देवून मुस्लिम समाजाने पक्षाच्या धोरणाला नेहमीच पाठबळ दिले.

देशातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने जाणारे असले, तरी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत तसेच यापूर्वी संगमनेर तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मुस्लिम समाजाने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा देवून त्यांना विजयी केले आणि शिवसेना भाजपासारख्या जातीयवादी पक्षांचा व विचारांचा पराभव केला. ही परिस्थिती पत्राद्वारे युवकांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचा विचार केला, तर संगमनेर तालुक्याने मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलेले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात व पक्षाचे इतर पदाधिकारी सत्तेसाठी थेट शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची भाषा करुन सत्तेत सहभागी होण्याचे सुतोवाच करीत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही अतिशय गंभिर बाब असून पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेकडे मुस्लिम समाज पक्षापासून दूर जाईल असा इशाराही देण्यात आला. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होत असून, पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेसोबत आघाडी करण्याची कृती म्हणजे मुस्लिम समाजाची एक प्रकारे फसवणूकच असल्याची भावना या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com