मुंबईत कॉंग्रेस आघाडीला  मुस्लिम मतदारांनी दिला आधार  

मुंबईत कॉंग्रेस आघाडीला  मुस्लिम मतदारांनी दिला आधार  

मुंबई : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसला मुस्लिम आणि पारंपरिक मतदारांनी साथ दिली; मात्र हिंदी भाषक मतदार बव्हंशी भाजपकडेच राहिला. भाजप-शिवसेनेला सर्व वर्ग व समाजांतून घसघशीत मते मिळाली आहेत.

मुंबईत आघाडीचे सहा आमदार निवडून आले; त्यापैकी कॉंग्रेसचे तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक आणि सपचा एक असे पाच आमदार मुस्लिम आहेत. कॉंग्रेसच्या धारावीतील वर्षा गायकवाड या एकमेव आमदार बिगरमुस्लिम आहेत. अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक निवडून आले. या मतदारसंघात साधारण: 23 टक्के मुस्लिम आणि 39 टक्के मराठी भाषक मतदार आहेत. मराठी मतांचे विभाजन आघाडी, युती, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झाले. मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाल्यामुळे मलिक निवडून आले.


वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे विश्‍वनाथ महाडेश्‍वर, बंडखोर तृप्ती सावंत व मनसे यांच्यात मराठी मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली. उत्तर भारतीय मतांचे कॉंग्रेस आणि शिवसेनेत विभाजन झाले. मुस्लिमांची मते एमआयएम आणि कॉंग्रेसला मिळाली. या परिस्थितीमुळे कॉंग्रेसचे झिशान सिद्दिकी निवडून आले. या मतदारसंघात मराठी भाषक मतदार 37 टक्के आणि मुस्लिम मतदार 30 टक्के आहेत. एमआयएमला मिळालेली 12 हजार मते वगळल्यास कॉंग्रेसला मोठा वाटा मिळाला आहे.


शिवाजीनगरमध्ये मुस्लिम मतांचे प्रमाण सुमारे 50 टक्के आहे. ही एकगठ्ठा मते सपचे अबू आझमी यांना मिळाली. या मतदारसंघात शिवसेनेला मराठी भाषक व उत्तर भारतीयांनी साथ दिली. मुंबादेवीत कॉंग्रेसचे अमीन पटेल यांची स्वत:ची मतपेढी आहे. तेथे एमआयएमचाही प्रभाव पडला नाही. मराठी मतांचे शिवसेना-मनसे यांच्यात विभाजन झाले. त्याचा फायदा मिळून पटेल 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्‍याने निवडून आले.


मालाड पश्‍चिममधून कॉंग्रेसचे अस्लम शेख तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यांना या वेळी चांगलेच झुंजावे लागले. कॉंग्रेसपासून 2014 मध्ये दुरावलेला हिंदी भाषक मतदार आजही भाजपकडे असल्याने शेख यांना फटका बसला. मराठी भाषकांनी भाजपचे रमेशसिंह ठाकूर यांना साथ दिली. या मतदारसंघात 24 टक्के मुस्लिम आणि 22 टक्के मराठी मतदार आहेत. कॉंग्रेसच्या पारंपरिक मतांबरोबर मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाल्यामुळे शेख यांनी 10 हजारांची आघाडी घेऊन विजय मिळवला.


चांदिवली येथे चार वेळेचे कॉंग्रेसचे आमदार नसीम खान यांचा शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी अवघ्या 380 मतांनी पराभव केला. या ठिकाणी 27 टक्के मराठी भाषक, 26 टक्के मुस्लिम आणि 22 टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. लांडे यांना एकगठ्ठा मराठी मते; तसेच उत्तर भारतीय मतांमधील मोठा हिस्सा मिळाला. मुस्लिम मतदारांनी खान यांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार व मतदारसंघ
- अस्लम शेख (कॉंग्रेस) मालाड पश्‍चिम : 22-23 टक्के मराठी, 24-25 टक्के मुस्लिम, 11 टक्के उत्तर भारतीय.


- अबू आझमी (सप) मानखुर्द शिवाजीनगर : 27-28 टक्के मराठी, 48-49 टक्के मुस्लिम, 12 टक्के उत्तर भारतीय.


- नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) अणुशक्ती नगर : 38 टक्के मराठी, 23 टक्के मुस्लिम, 14 टक्के उत्तर भारतीय.


- झिशान सिद्दिकी (कॉंग्रेस)वांद्रे पूर्व : 37 टक्के मराठी, 31 टक्के मुस्लिम, 13 टक्के उत्तर भारतीय.


- वर्षा गायकवाड (कॉंग्रेस) धारावी : 25 टक्के मराठी, 30 टक्के मुस्लिम, 12 टक्के उत्तर भारतीय.


- अस्लम शेख (कॉंग्रेस) मुंबादेवी : 18 टक्के मराठी, 49 टक्के मुस्लिम.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com