muslim about shivsena | Sarkarnama

मोदींच्या भाजपपेक्षा सेना बरी: मुस्लिम समाजमनातील बदलते वारे

महेश पांचाळ
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

गेल्या विधानसभेत एमआयएमने पहिल्यांदाच रिंगणात उतरवून मुस्लिम समाजामध्ये वेगळी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. भायखळा मतदारसंघातूनही एमआयएमचे वारीस पठाण निवडून आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर सेना भाजपला मुस्लिम समाजात नगण्य महत्त्व असताना, शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्याने, कट्टर मुस्लिम समाजातील सेनेची खलनायकी प्रतिमा हळू हळू बदलू लागली आहे का? हा नवा चर्चेचा विषय बनला आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टीका करत, महापालिका निवडणुकीत भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेला मुस्लिमबहुल मतदारसंघात साथ मिळाल्याचे दिसून आले आहे. मोदीच्या भाजपपेक्षा सेना बरी असे मुस्लिम समाजमनातील बदलते वारे पाहावयास मिळत आहेत. 
मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका करत, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख लक्ष्य केले होते. 1993च्या जातीय दंगलीचा संदर्भ देत, गुजराती, मारवाडी, जैन या समाजाला शिवसेनेमुळे कसे संरक्षण दिले याची आठवण उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून वारंवार दिली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अमराठी समाजाकडून भाजपला सर्वांधिक मते मिळाल्याने मुंबईत भाजपची ताकद वाढली होती, हे लक्षात घेऊनच ठाकरे यांनी 93 च्या दंगलीच्या वेळी बाकीचे कुठे होते, असा सवाल उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र मुंबईत गुजराती, मारवाडी,जैन आणि उत्तरभारतीय समाजातील मतदारांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात मते टाकल्यामुळे भाजपची मुंबईतील ताकद वाढल्याचे दिसून आले आहे. या उलट शिवसेनेकडून काही ठिकाणी प्रचारात 93 च्या दंगलीत फक्त शिवसैनिकांवर गुहे दाखल झाले, असे जाहीर सभेत शिवसेनेकडून सांगण्यात आले असताना, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम मोहल्ल्यात शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटले आहे. 

शिवसेनेचा भगवा झेंडा दिसला की, गेली अनेक वर्षे आकस करणाऱ्या मुस्लिम समाजात शिवसेनेबाबत यातून मतपरिवर्तन होत असल्याचे चित्र पुढे आले. वांद्रयाच्या बेहरामपाडा भागातून हाजी मोहम्मद हलीम खान आणि अंधेरी आंबोली येथून शाहिदा खान हे दोन मुस्लिम उमेदवार सेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. मुंबईतील मिनी पाकिस्तान म्हणून ज्या मुस्लिम वस्त्यांचा उल्लेख केला जातो, त्यात वांद्रयांचा बेहरामपाडा भाग ओळखला जातो. या परिसरात शिवसेनेच्या उमेदवाराला 21.17 टक्के मते मिळाली आहे तर आंबोलीतील शाहिदाने 31 टक्के मते पदरात पाडून घेतली आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या असताना, बहुमतासाठी अपक्षांची जुळवाजुळव करत असताना, तिसरा मुस्लिम अपक्ष उमेदवार चंगेश जमाल मुलतानी यांनींही शिवसेनेला पाठिंबा देणे पसंत केले आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेने पाच मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते, त्यातील अन्य पराभूत उमेदवारांनी 11 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मते घेतल्याचे दिसून आले आहे.बेहराम पाड्यातील हाजी खानच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेला पूर्वी 100 ते 200 मते मिळत होती. मी 4 हजार 52 मते मिळवून विजयी झालो. शिवसेना हा पक्ष स्थानिक नागरिकांच्या रोजच्या अडचणींना धावून येणारा आहे. त्यामुळे शिवसेना हा मुस्लिमविरोधी असल्याचा केलेला प्रचार चुकीचा आहे. उघड भूमिका घेणारा शिवसेना हा मुस्लिम समाजाचेही हित पाहणारा आहे. 

मुंबईच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या मानाने मुस्लिम समाजाची संख्या ही 18.56 टक्के आहे. यापूर्वी मुस्लिम मतांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सपा, मुस्लिम लीग यांचे राजकारण चालत होते. गेल्या विधानसभेत एमआयएमने पहिल्यांदाच रिंगणात उतरवून मुस्लिम समाजामध्ये वेगळी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. भायखळा मतदारसंघातूनही एमआयएमचे वारीस पठाण निवडून आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर सेना भाजपला मुस्लिम समाजात नगण्य महत्त्व असताना, शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्याने, कट्टर मुस्लिम समाजातील सेनेची खलनायकी प्रतिमा हळू हळू बदलू लागली आहे का? हा नवा चर्चेचा विषय बनला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात कल्याणचे शिवसेनेचे माजी मंत्री साबीर शेख यांचा आदराने उल्लेख केला जात होता. शिवसेनेने 1993 च्या दंगलीनंतर प्रखर हिंदुत्व स्वीकारल्यानंतर मुस्लिम समाजात शिवसेनेबाबत नेहमीच तेढ राहिली होती. या निवडणुकीत भाजपकडूनही दोन मुस्लिम उमेदवार रिंगणात होते. ते सर्व पराभूत झाले तर शिवसेनेला मात्र मुस्लिम मतदारांनी स्वीकारल्याने येणाऱ्या काळात शिवसेनेची सर्वसमावेशक भूमिका राजकीय निरीक्षकांनाही विचार करायला लावणारी आहे. 

गुजरात दंगलीची पार्श्‍वभूमी असलेले नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. शिवसेना हा भाजपसोबत सत्तेत असला तरी, मोदींच्या चुकीच्या धोरणावर उघड टीका करण्याचे काम उद्धव ठाकरे हे नेहमी करत आहेत, याचे मुस्लिम समाजालाही अप्रूप वाटते.

शिवसेना हा दिलदार शत्रूसारख्या स्वभावाचा असल्याने मुस्लिम समाजात शिवसेनेबाबत मतपरिवर्तन होताना दिसत असावे. त्यात कोणत्याही अडीअडचणीला धावून येणारा शिवसैनिक हा जातपातधर्म पाहत नाही, याचा अनुभव बेहरामपाड्यात मुस्लिम मतदारांनी याआधीही घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत हे मुस्लिमबहुल खेरवाडी मतदारसंघातून निवडून येत होते, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्‍लेषक योगेद्र ठाकूर यांनी दिली. तर, ऑल इंडिया उलेमा कौन्सिलचे सरचिटणीस मौलाना मेहमूद दरियाबादी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि सेना यांच्यात संघर्ष निर्माण झाला . संघ विचारांचे पाठबळ असलेल्या नरेंद्र मोदींच्या भाजपपेक्षा शिवसेनेबाबत सर्वधर्मनिरपेक्ष समुहामध्ये सहानुभूती असणे स्वाभाविक होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख