राजकीय ‘भाऊबंदकी’ नंतर मुंडे - क्षीरसागरांच्या घरात पदांची रेलचेल

राज्यात मोजक्याच राजकीय घराण्यांमध्ये ‘काका - पुतण्या’ अंक घडला. त्यातील सुरुवातीला जिल्ह्यात मुंडेंच्या घरात तर नंतर क्षीरसागरांच्या घरात हा अंक घडला. घरातील राजकीय वादामुळे इतर पक्ष आणि नेते झाकोळले गेले. मग,राजकीय ‘भाऊबंदकी’ नंतर मुंडे - क्षीरसागरांच्या घरातच पदांची रेलचेल अशी स्थिती झाली.
Mundes & Kshirsagars all posts in the family
Mundes & Kshirsagars all posts in the family

बीड :  कुठलाही व्यवसाय वा राजकारण करताना कुटूंबातील सर्वजण एकत्र असले तर यश हमखास येते असे म्हणातात. मात्र, बीडच्या राजकारणात राजकीय घराण्यांमधील फुटीमुळे काही नुकसान आणि तत्कालिक चर्चा झाली असली तरी याच कुटूंबात पदांची रेलचेल झाल्याचे दिसते.  राज्यातील महत्वाची पदे परळीच्या मुंडे कुटूंबाकडे आहेत. तर, बीडच्या क्षीरसागर कुटूंबातही विविध पदांची रेलचेल आहे. 

दिवंगत केशरबाई क्षीरसागर ह्या राज्यात नाव केलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला नेत्या. ज्या काळात महिलांसाठी ‘चुल आणि मुल’ सुत्र होते त्यावेळी सरपंच पदापासून सुरु झालेल्या केशरबाई क्षीरसागरांचा प्रवास पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार  अशा चढत्या क्रमाचा राहीला.

तर, दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनीही जिल्हा परिषद सदस्य ते आमदार, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री असा चढत्या क्रमाचा राजकीय प्रवास केला. भाजपचे आणि राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक अशी त्यांची कायम ओळख राहीली.

विशेष म्हणजे, दोन्ही ओबीसी नेत्यांच्या घरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने  आणि प्रतिकुल परिस्थितीतून मोठी राजकीय मजल  मारली . दोघांनाही विरोधकांइतकाच स्वकीयांचा कायम छुपा विरोध सहन करावा लागला. 

 दिवंगत गोपीनाथराव मुंडे प्रथम उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. पुढे पुतणे धनंजय मुंडे देखील सदस्य आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. पुर्वीच्या रेणापूर आणि नंतरच्या परळी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे गोपीनाथ  मुंडे प्रथम २००९ साठी प्रथम लोकसभेत गेल्यानंतर त्यांच्या जागी कोण असा राजकीय मुद्दा पुढे आला आणि त्यांच्या थोरल्या कन्या पंकजा मुंडे परळीतून विजयी झाल्या. यावेळी या जागेवर आपल्याला संधी मिळावी अशी धनंजय मुंडे यांची अपेक्षा होती. दरम्यान, त्यांना भाजपकडून विधान परिषदेवरही संधी देण्यात आली.

 मात्र, विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची आणि स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्याची त्यांची मनिषा लपून राहीली नाही त्यातूनच २०१२ च्या नगर पालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मास लिडर आणि भाजपचे प्रमुख नेते असलेल्या मुंडेंच्या घरात राजकीय भाऊबंदकी झाल्याने या ‘काका - पुतण्या’ अंकाची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. दरम्यान, या भाऊबंदकीमुळे परळी भागातील राजकारण मुंडे कुटूंबियांभोवतीच फिरण्यास सुरुवात झाली. इतर पक्षातले या दोघांचे विरोधकही झाकोळले गेले. दोघांचीच रस्सीखेच सुरु झाली आणि पदांचे दावेदारही दोघेच झाले. 

पंकजा मुंडे यांना भाजपच्या सुकाणू समितीमध्ये स्थान मिळाले आणि त्यांना मंत्रीमंडळातले महत्वाचे पदेही मिळाली. दिवंगत मुंडेंच्या जागी पोटनिवडणुकीत त्यांच्या भगीनी डॉ. प्रितम मुंडे विक्रमी मतांनी निवडुण आल्या. वैद्यनाथ कारखान्याच्याही पंकजा मुंडे अध्यक्ष असून वैद्यनाथ बँकेच्या डॉ. प्रितम मुंडे संचालिका आहेत. धाकट्या  यशश्री मुंडेही कारखान्याच्या संचालिका आहेत.

 तर, राष्ट्रवादीनेही विधानसभेत पराभूत झालेल्या धनंजय मुंडे यांना  विधान परिषदेवर घेऊन विरोधी पक्षनेतेपदही दिले. त्यांच्या बाजूने असलेले चुलत बंधू अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. एकूणच या घरात राज्यपातळीवरील दोन प्रमुख पदांसह स्थानिक पातळीवरील सत्तास्थानेही मुंडे कुटूंबियांच्या वर्चस्वाखाली आहेत. 

इकडे क्षीरसागर कुटूंबियांमध्येही असेच आहे. दिवंगत केशरबाई क्षीरसागर सक्रीय असताना सुरुवातीला जयदत्त क्षीरसागर यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करुन विधानसभेत प्रवेश केला. उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबीनेट मंत्रीपदे त्यांनी भूषविली. तर, धाकटे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर पालिकेच्या राजकारणात पार रोवून आहेत. दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर जिल्हा परिषद आणि गजानन कारखाना सांभाळत होते. 

मागच्या वर्षी रवींद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर यांनी असेच आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बंड उभारल्याने क्षीरसागरांमधली भाऊबंदकीही राजकीय चर्चेचा विषय ठरली. मात्र, या निमित्ताने बीडमधले राजकारण क्षीरसागरांभोवतीच केंद्रीत झाले आणि इतर सर्वच पक्ष झाकोळले गेले. पालिका निवडणुकीत डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष तर विरोधात असलेले पुतणे हेमंत क्षीरसागर उपाध्यक्ष झाले. 

स्विकृत सदस्यांमध्ये डॉ. भारतभूषण यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांची वर्णी लागली. तर, संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने असलेले चुलतबंधू राजेश क्षीरसागर  नगरसेवक झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप क्षीरसागर व त्यांच्या आई सुरेखा क्षीरसागर हे दोघे विजयी झाले. म्हणजेच मतदार संघातील आमदारकीसह पालिकेतील दोन प्रमुख पदे आणि नगरसेवकपदेही याच घरात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com