munde and vinayak mete problem | Sarkarnama

मुडेंवरील महाजनादेश यात्रेतील कुरघोडी मेटेंना भोवली, जिल्हा परिषदेत आता अस्तित्व झाले शून्य

दत्ता देशमुख
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

शिवसंग्रामचे चार जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंनी तिघांना गळाला लावून विनायक मेटे यांना शह दिला होता. 

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यातील शह - काटशहाचे राजकारण संपायचे नाव घेत नाही. शिवसंग्रामच्या चौथ्या जिल्हा परिषद सदस्याला भाजपमध्ये घेऊन पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांना चांगलाच धक्का दिला आहे. भारत काळे यांनी गुरुवारी मुंबईत रॉयलस्टोनवर भाजपमध्ये प्रवेश केला. 

विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांनीच पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात राजकीय वितुष्ट आले. स्वतंत्र जिल्हा परिषद निवडणुक लढविणाऱ्या शिवसंग्रामचे चार सदस्य विजयी झाले. जिल्हा परिषद सत्तारोहणाच्या निमित्ताने पुन्हा दोघांमध्ये राजकीय दिलजमाई होऊन जिल्हा परिषदेत शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना उपाध्यक्ष मिळाले. परंतु, दोघांमधील राजकीय संघर्षाचा दुसरा अंकही जिल्हा परिषदेच्या कारभारामुळेच सुरु झाला. 

जिल्हा परिषदेतील कारभाराच्या मस्केंच्या तक्रारींवरुन मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आणि पुन्हा मेटे - मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यात प्रथम मस्केंनीच मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये उडी मारली. नंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक लोढा आणि विजयकांत मुंडे यांना भाजपमध्ये घेऊन पंकजा मुंडेंनी मेटेंना शह दिला. याला काटशह देण्यासाठी मेटेंनी बीडमध्ये भाजप उमेदवाराला विरोध केला. परंतु, निकाल वेगळाच लागला. आता शिवसंग्राममधील शेवटचे आणि चौथे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनीही पंकजा मुंडेंच्या नेतृत्व स्विकारले आहे. गुरुवारी मुंबईत पंकजा मुंडेंच्या रॉयलस्टोल या निवासस्थानी झालेल्या प्रवेशावेळी आमदार सुरेश धस, राजेंद्र मस्के, विजयकांत मुंडे सोबत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख