धनंजय मुंडेंना मंत्रिपद कि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ; समर्थकांना उत्सुकता

भाजपमध्ये असताना युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांना पक्ष संघटनात्मक जुळवणीचा दांडगा अनुभव आहे. तसेच, झेडपी उपाध्यक्षपदासह आमदार आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना वैधानिक कामासह प्रशासनावर अंकुश ठेवण्याचेही कौशल्य त्यांच्यात आहे.
  धनंजय मुंडेंना मंत्रिपद कि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ; समर्थकांना उत्सुकता

बीड : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मागच्या पाच वर्षांत पाडलेली छाप आणि स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 30 हजारांवर मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षाकडून चांगली बक्षिसी मिळणार असे मानले जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेलाच त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठीही पुढे येत आहे. दोन्ही पैकी कोणती संधी धनंजय मुंडेंना मिळणार याची त्यांच्या समर्थकांत उत्सुकता आहे. 

जिल्हा परिषद सदस्यपदापासून राजकीय कारकिर्द सुरु केलेले धनंजय मुंडे यांच्यात पक्ष संघटनात्मक कामासह प्रशासनातील कामाचाही अनुभव आहे. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षपद किंवा मंत्रीपदही खुबीने सांभाळू शकतील. धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले, उपाध्यक्षपद भाजपध्ये असलेल्या मुंडेंना मिळाले. यावेळीच त्यांनी आपल्या राजकीय व संघटनात्मक कौशल्याची चुणूक दाखविली होती. या पदावर काम करताना प्रशासनावर अंकुश ठेवून त्यांनी कामे मार्गी लावून घेतली होती. 

युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशा दोन्ही पदांवर काम करुन संघटनात्मक कौशल्य सिद्ध केले आहे. त्यानंतर दोन वेळा विधान परिषदेचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद या पदांच्या माध्यमातून त्यांनी एकाच वेळी प्रशासनिक, संघटनात्मक कौशल्य सिद्ध केले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना सभागृहातील आक्रमकता, विषयाचा अभ्यास आणि विषयाच्या खोलात जाऊन तत्कालिन सत्ताधाऱ्यांवर आक्रम शैलीत तुटून पडणारे धनंजय मुंडे सभागृहाच्या बाहेरही तेवढेच आक्रमक असत. 

मागच्या पाच वर्षांत मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, बाजार समिती अशा निवडणुका एकहाती जिंकणाऱ्या धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत चुलत बहिण आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा 30 हजारांवर मतांनी पराभव केला. यातूनही त्यांनी संघटनात्मक कौशल्य दाखवून दिले आहे. एकूणच धनंजय मुंडे मंत्रिपदासाठीही तेवढेच पात्र असून प्रदेशाध्यक्षपदासाठी लागणारे गुणही त्यांच्या अंगी आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांत कधी त्यांचे नाव येते तर जयंत पाटील मंत्री झाल्याने त्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्षपदासाठीही धनंजय मुंडेंच्या नावाची चर्चा होत आहे. ओबीसी आणि आक्रमक आणि तरुण चेहरा म्हणून कदाचित पक्ष त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाचीही धुरा देऊ शकतो. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो की प्रदेशाध्यक्षपदाची गदा त्यांच्या खांद्यावर पडते याकडे त्यांच्या समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com