munde and bjp leader | Sarkarnama

पंतप्रधान ते पालकमंत्री : धनंजय मुंडेंची सर्वांवरच टीका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

बीड जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यासह अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके आदी नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काबाबत नाव न घेता पंकजा मुंडे व आमदारांवर टिका केली. तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवरही टिका केली. 

बीड : टीकेला कुठल्याही परिसिमा नसतात आणि सामान्य माणूसही कोणावरही टिका करु शकतो. धनंजय मुंडे तर बडे नेते असल्याने कोणाची उणे बाजू दिसल्यास तो सोडत नाहीतच. मंगळवारी त्यांनी पंतप्रधानांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांवरच टिका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाव न घेता पालकमंत्री पंकजा मुंडेंवरही त्यांनी हल्ला चढविला. 

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत श्री. मुंडे यांच्यासह पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, राजेंद्र जगताप, पृथ्वीराज साठे, अशोक डक, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सतीश शिंदे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळाकडे निवडून आलेले आमदार आणि पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचा टोला लगावला. 

ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर त्यांनी "ऊसतोड मजुरांचा वापर केवळ दसरा मेळाव्यापुरता होतो,' असे नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाना साधला. राज्यातील चार आणि केंद्रातील साडेचार वर्षाच्या सत्तेतून एकतरी ऊसतोड मजुराच्या हातून कोयता पडावा असे काम झाले का, असा सवाल त्यांनी केला. ऊलट ऊसतोड मजुरांच्या मुलीवर बलात्कार झाले. त्यांचे संरक्षणही सरकार करु शकत नसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

यानंतर वेळ आली मुख्यमंत्र्यांची. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात दुष्काळी आढावा बैठक घेतल्यानंतर प्रशासन सतर्क होऊन काम करेल ही अपेक्षा फोल ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तर, कर्जमाफीवर कमलनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल "दोन विद्यार्थ्यांमधील हा फरक आहे' म्हणत. कमलनाथांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन तासांत कर्जमाफी केली तर देवेंद्र फडणवीस यांना अभ्यास करायला साडेतीन वर्षे लागल्याचा टोला लगावत ही कर्जमाफी फसवी असल्याचा सांगून 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असल्याचे सांगीतले जात असले तरी 14 हजार कोटी रुपयांचीच असल्याचा आरोप त्यांनी केला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना त्यांनी मुंबईत भूमिपुजन केलेले एकही काम सुरु झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यापैकी एकही काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही अशी टिका त्यांनी केली. एकूणच आज धनंजय मुंडे यांनी टिका करताना पंतप्रधानांपासून आमदारांपर्यंत सर्वांनाच रिंगणात ओढले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख