गोपीनाथराव विरोधकांनाही आपलेसे करून घेत...

 गोपीनाथराव विरोधकांनाही आपलेसे करून घेत...

औरंगाबाद : मी आणि गोपीनाथ मुंडे 1986 ते 2004 पर्यंत भाजपच्या कोअर कमिटीत एकत्र काम केले आहे. अगदी जिल्हाध्यक्ष नेमण्यापासून विधानसभा, लोकसभा उमेदवारी द्यायची असेल तर एकमेकांना विचारल्याशिवाय कुठालाही निर्णय होत नव्हता. पण एकदा भाजपमधील एका पदाधिकाऱ्याला कुणाच्या तरी सांगण्यावरून गोपीनाथ मुंडेंनी पक्षातून काढून टाकले. तेव्हा माझा आणि त्यांचा वाद झाला होता, पक्षातून माणसं जेव्हा जेव्हा बाहेर जायची तेव्हा आमच्यात तात्पुरता संघर्ष व्हायचा अशी आठवण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे त्यांच्या सोबतच्या आठवणीत रमले. अगदी 1984 ते 2014 पर्यंतच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. पक्षात एकत्र काम करत असतांना झालेले मतभेद, त्यामागची कारण याचा देखील उल्लेख त्यांनी केला. हरिभाऊ बागडे म्हणाले, एकदा अंबादास दानवे या त्यावेळच्या भाजप कार्यकर्त्याला गोपीनाथरावांनी अचानक कुणालाही न सांगता पक्षातून काढले. बरं त्याचा फॅक्‍स एका वृत्तपत्राला केला. यावरून माझा आणि त्यांचा वाद झाला. पक्षांतून जेव्हा कुणी बाहेर जायचे तेव्हा आमच्यात वाद व्हायचा. मी त्यांना फोन करायचो तेव्हा ते म्हणायचे हरिभाऊ मी तुम्हाला नंतर फोन करतो. पण एवढी वर्ष एकत्र काम करूनही कधी आमच्यात बेबनाव किंवा टोकाचे मतभेद झाले नाही. लगेच जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. 

1985 मध्ये असाच एक प्रसंग आमच्या दोघांच्या बाबतीत घडला. विधानसभा निवडणुकीत पंडीतराव दौड यांच्याकडून गोपीनाथराव पराभूत झाले होते आणि मी माझ्या मतदारसंघातून निवडून आलो होतो. तेव्हा औरंगाबाद जिल्हा परिषद अस्तित्वात नव्हती पण अनंतराव कुलकर्णी हे सीईओ म्हणून काम पाहत होते. माझ्या मतदारसंघातील एका ग्रामपंचायतीने एक बोअर खोदला होता. विशेष म्हणजे हा बोअर व त्याचा पंप सौरउर्जेवर चालायचा. त्याकाळात सौरउर्जे सारखा प्रयोग म्हणजे नवी गोष्ट होती. तेव्हा पंडीतराव दौड हे ग्रामविकास राज्यमंत्री होते. ते जेव्हा मराठवाडा दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांनी या गावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मला फोन केला, मी त्यांना घेऊन गावांत गेलो, त्यांना हा प्रयोग दाखवला, दोघांनी सोबत चहा घेतला. पंडीतराव दौड यांच्याकडून पराभव झाल्यामुळे तेव्हा गोपीनाथ मुंडे त्यांच्याशी बोलत नव्हते. त्यामुळे पंडीतरावांना मी माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो, त्यांच्या सोबत चहा पिलो हे काही गोपीनाथरावांना आवडले नाही. त्यांनी त्यावेळचे संघटनमंत्री शरदभाऊ कुलकर्णी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पण पुढच्याच निवडणुकीत पंडीतराव दौड आणि गोपीनाथराव एकत्र प्रचार करतांना दिसले. 

गोपीनाथरावांचे वैर फार काळ कुणाशी टिकलेच नाही. ते विरोधकांनाही आपलसं करून घ्यायचे. विलासराव देशमुख आणि त्यांची दोस्ती तर राजकारणात आजही चर्चिली जाते. मध्यंतरी काही काळ विलासराव देशमुख कॉंग्रेसपासून लांब राहिले त्याला देखील गोपीनाथराव मुंडे हेच कारणीभूत होते. ते व्यासपीठावरून एकमेकांवर जेव्हा टोकाची टीका करायचे त्या दिवशी रात्री एकमेकांना आठवणीने फोन करायचे. 

(शब्दांकनः जगदीश पानसरे) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com