munde | Sarkarnama

परदेशींपाठोपाठ आता मुंढेचाही बळी

उत्तम कुटे ः सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 मार्च 2017

पिंपरी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने मुदतपूर्व तडकाफडकी बदली केल्याने अनधिकृत बांधकामाविरुद्ध धडक कारवाईसाठी राज्यात कुणी अधिकारी पुढे येईल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच या बदलीतून मुंढे यांच्यासारखेच प्रामाणिक व धडाकेबाज अधिकारी अशी ख्याती असलेले पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पालिका आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या स्मृतीही चाळवल्या गेल्या आहेत. या दोघाही आयएएस अधिकाऱ्यांची बदली ही त्यानी अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई केल्यानेच झाली आहे. 

पिंपरी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने मुदतपूर्व तडकाफडकी बदली केल्याने अनधिकृत बांधकामाविरुद्ध धडक कारवाईसाठी राज्यात कुणी अधिकारी पुढे येईल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच या बदलीतून मुंढे यांच्यासारखेच प्रामाणिक व धडाकेबाज अधिकारी अशी ख्याती असलेले पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पालिका आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या स्मृतीही चाळवल्या गेल्या आहेत. या दोघाही आयएएस अधिकाऱ्यांची बदली ही त्यानी अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई केल्यानेच झाली आहे. 

डॉ. परदेशी हे,तर "हेडमास्तर'च होते.त्यांच्या कार्यकाळात प्रशासन सुतासारखे सरळ आले होते. त्यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी गणवेशात येत होते. पालिका मुख्यालयासह सर्व पालिका कार्यालये स्वच्छ व सुंदर झाली होती. भ्रष्टाचाराला पायबंद बसला होता. तो करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई होत होती. बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत होती. परिणामी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांनी त्यांचा धसका घेतला होता. त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात अनधिकृतपणे एक वीटही रचली गेली नाही. सारथीसारख्या त्यांच्या उपक्रमाची देशभर दखल घेतली गेली. त्यातून लोकप्रतिनिधींचा भाव कमी 
झाल्याने त्यांच्याविरोधात नगरसेवकांसह शहरातील आमदारही एकवटले. त्यांनी राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारकडे तक्रार केली आणि डॉ.परदेशींची बदली झाली. त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे शहरात कारभार सुरू झाला असून बेकायदेशीर बांधकामे बोकाळली आहेत. तर, दुसरीकडे प्रशासन पुन्हा सुस्त होऊन निर्ढावले आहे. 

डॉ. परदेशी व मुंढे यांच्याबाबतीत अनेक साम्य व योगायोग आहेत.आघाडी सरकारने व त्यातही या सरकारातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. परदेशी यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आणले होते. मात्र, ते येथे डोईजड ठरल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी तक्रार केल्याने पवार यांना डॉ.परदेशी यांची उचलबांगडी करावी लागली होती. तीच स्थिती युती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे. राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांनी मुंढे यांना नवीन मुंबईत पाठवले. मात्र,त्यांनी तेथे सरसकट सर्वच अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध धडाका लावला. त्यात भाजपचे आमदार व नगरसेवक यांचे हितसंबंध भरडले गेले.त्यामुळे स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह भाजपच्याच नव्हे,तर सत्ताधारी राष्टवादीसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंढे यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने त्यांची बदली नगरविकास खाते असलेल्या मुख्यमंत्र्यांना करावी लागली. त्यांच्या जागी राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी आले आहेत. 

असाही योगायोग 
डॉ. परदेशी यांची आयुक्तपदावरून राज्याचे मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक म्हणून पुणे येथे बदली झाली होती. तर, डॉ. मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्याजागी नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे व ते करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले हे दोघेही प्रामाणिक व धडाकेबाज सनदी अधिकारी हे राजकारण्यांचे बळी ठरले आहेत. दुसरीकडे त्यांची अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने उचलून धरलेली आहे. दिघ्यासह संपूर्ण नवी मुंबई परिसरातील अशा बांधकामांना अभय देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. दुसरीकडे डॉ.परदेशी यांनी सुरू केलेली उद्योगनगरीतील बेकायदेशीर बांधकामाविरुद्धची कारवाई पुढे सुरू ठेवण्याचा आदेश याच न्यायालयाने देताना तो कायमही ठेवला आहे. 

वाईटातून चांगले 
डॉ. परदेशी यांना नंतर केंद्रात आलेल्या भाजप सरकारने पंतप्रधान कार्यालयात घेतले. एवढेच नाही, तर तेथे अल्पावधीतच त्यांना पदोन्नतीही दिली. यामुळे आघाडी सरकारने बेदखल केलेल्या परदेशींना भाजपने दिल्लीत पुन्हा मानाचे पान दिले. वाईटातून कधी चांगले होते, या म्हणीचा त्यांच्याबाबतीत पुन्हा प्रत्यय आला. त्याची पुनरावृत्ती मुंढे यांच्याबाबतीत होते, का याची आता उत्सुकता आहे. त्यांची बदली डबघाईला आलेल्या व अत्यंत सुमार व दर्जाहीन सेवा असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या पीएमपीएमएल या परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आल्याचे समजते. मुढे हे पीएमपीएमएलचे गाळात रुतलेले चाक बाहेर काढून ती पुन्हा रुळावर आणतात का याची उत्सुकता आहे. त्यातून ही सेवा सुधारली गेली,तर मुंढे यांची बदली ही सुद्धा डॉ. परदेशींप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने इष्टापत्तीच ठरणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख