मुंदडा दोन्ही पातळ्यांवर सक्रीय; आमदार मंत्र्यांकडे; सासऱ्यांचे उपोषण

आमदार नसतानाही जनसंपर्क आणि पाठपुराव्यातील सातत्य या मुंदडा यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. आता घरात आमदारकी आल्यानंतरही सामुहिक, वैयक्तीक कार्यक्रमांना हजेऱ्या, शासकीय कामांचा पाठपुरावा सुरुच आहे.
मुंदडा दोन्ही पातळ्यांवर सक्रीय; आमदार मंत्र्यांकडे; सासऱ्यांचे उपोषण

बीड : आमदार नसलो तरी लोकांचे देणे लागतो या भावनेतून कायम जनसंपर्क आणि पाठपुराव्यात सातत्य ठेवणाऱ्या मुंदडांच्या घरात आमदारकी आल्यानंतरही त्यांची ‘स्टाईल’ कायम आहे. मागच्या दोन दिवसांपासून आमदार नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा मतदार संघातील प्रश्नांबाबत मंत्र्यांना भेटत आहेत. तर, इकडे अंबाजोगाईकरांच्या प्रश्नासाठी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे उपोषण सुरु आहे. एकाच वेळी दोन्ही पातळ्यांवर सक्रीय असल्याचे राजकारणातले हे दुर्मिळ उदाहरण ठरावे.

केज मतदारसंघातून दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा सलग पाच वेळा आमदार राहील्या. प्रतिकुल राजकीय समिकरणातही त्यांच्या विजयाचे मताधिक्क्य कायम चढते राहीले. याला कारणीभूत ठरले डॉ. विमल मुंदडा यांचा जनसमान्यांसाठीचा संपर्क आणि पती नंदकिशोर मुंदडा यांचा लोकांच्या कामासाठीचा पाठपुरावा. मागच्या वेळी त्यांच्या स्नुषा नमिता मुंदडांचा पराभव झाला. परंतु, लोकांशी असलेली संपर्काची नाळ या घराने तुटू दिली नाही. लग्न, मुंजी, बारशे, अंत्यविधी, वाढदिवस अशा मतदार संघातील सुख - दु:खाच्या प्रसंगात मुंदडांनी कायम हजेरी लावली. सत्तेत नसतानाही सामान्यांच्या प्रश्नांसाठी निवेदन, आंदोलनाचे हत्यार कायम उपसले. म्हणूनच यावेळी केज मतदार संघातून विजयी झालेल्या नमिता मुंदडा यांच्या नावावर सर्वाधिक मतांनी विजयाचा विक्रमही नोंदला गेला.

 
दरम्यान, विजयानंतर लोकप्रतिनिधींकडून लोकसंपर्क कमी होतो अशा कायम तक्रारी असतात. परंतु, यालाही मुंदडा अपवाद ठरले. त्यांचे पहिल्याप्रमाणे जनसंपर्क आणि लोकांच्या भेटीगाठी सुरुच आहेत. पण, मागच्या दोन दिवसांचा मागोवा घेतला असता मुंदडा दोन्ही पातळ्यांवर सक्रीय असल्याचे दिसते.

मतदारसंघातील प्रश्नांबाबत आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या भेटी घेतल्या. अंबाजोगाईतील वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य केंद्रांचे प्रश्न मंत्र्यांच्या कानावर घालून सोडविण्याची मागणी केली. तसेच, विविध परिक्षा उत्तर्णी होऊनही नियुक्त्या न मिळाल्याने मागच्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर आंदेालन करणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांचीही नमिता व अक्षय मुंदडांनी भेट घेतली. तर, इकडे अंबाजोगाईकरांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा बनलेल्या तलाठ्याच्या बदलीच्या प्रश्नावर जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडांनी उपोषण केले. अखेर या तलाठ्याचे निलंबन झाले. एकूणच मतदारांच्या प्रश्नांसाठी दोन्ही पातळ्यांवरील सक्रीयता मुंदडांनी कमी होऊ दिली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com