शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या (yashwantrao chavan pratishthan) वतीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप (Sharad Pawar Inspire Fellowship) इन ॲग्रीकल्चर’,‘शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप’ (शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती) आणि ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’ या तीन फेलोशीप दिल्या जाणार आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा १२ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवस यावर्षीपासून अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणाऱ्या होतकरु तरुण तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ (Sharad Pawar Inspire Fellowship)दिल्या जाणार आहेत. याबाबतची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

sarkarnama

''पवार साहेबांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सुत्राचा वसा कायम ठेवला. पवार साहेबांच्या नावाने फेलोशीप जाहीर करताना आनंद होत आहे. विकासाची जाण असणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची धमक असणाऱ्या तरुण-तरुणींना याचा नक्कीच फायदा होईल,'' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या (yashwantrao chavan pratishthan) वतीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप (Sharad Pawar Inspire Fellowship) इन ॲग्रीकल्चर’,‘शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप’ (शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती) आणि ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’ या तीन फेलोशीप दिल्या जाणार आहेत. यापैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशीपचा कार्यक्रम आजपासून (ता. ८) सुरु करण्यात आला. निवडलेल्या फेलोंची घोषणा ता. १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी पवार यांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना ती फेलोशीप सन्मानपूर्वक प्रदान केली जाणार आहे.

Sharad Pawar
आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मोठेपणा लागतो ; भाजपला टोला

शेती क्षेत्रासाठी फेलोशीपसाठी महाराष्ट्रातील जिज्ञासू, विषयातील रुची आणि परिणामकारक नेतृत्त्वगुण या निकषांवर या तरुण-तरुणींची तज्ज्ञांच्या कमिटीद्वारे निवड करण्यात येईल. यासाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यातून शॉर्टलिस्ट केलेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्यानंतर तज्ज्ञांची कमिटी त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील ८० जणांची फेलोशीपसाठी निवड केली जाणार आहे. या फेलोंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ व अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहांमध्ये दमदार लेखन करणाऱ्या प्रयोगशील लेखक-लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून निवड झालेल्या तरुण-तरुणींच्या मुलाखती घेऊन त्यातून दहा जणांना ही फेलोशीप जाहीर करण्यात येणार आहे. या फेलोंना साहित्य निर्मितीसाठी नामवंत साहित्यिक मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी मदत देखील करण्यात येणार आहे.

''शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांसाठी 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन' चा कार्यक्रम डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या प्रयोगशील तरुणाईसाठी ही एक संधी असून या फेलोशीपसाठी जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी अर्ज सादर करावेत,'' असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

MKCL फौंडेशन, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे फेलोशिप उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे .शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’चे मुख्य समन्वयक विवेक सावंत असतील . याप्रसंगी फेलोशिपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री बी. के. अग्रवाल ,‘शरद पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप’चे मुख्य समन्वयक प्रा.नितीन रिंढे,आदी उपस्थित होते.‘ त्याचबरोबर शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’चे मुख्य समन्वयक डॉ.निलेश नलावडे, हे झूमद्वारे उपस्थित होते.

‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’

• अर्ज मागविण्याची तारीख :८ ऑक्टोबर २०२१ पासून

• अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख : १५ नोव्हेंबर २०२१

• अर्जांची छाननी करण्याची तारीख : १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर

• निवडीची घोषणा : १ डिसेंबर २०२१

• फेलोशीपची सुरुवात : १२ डिसेंबर २०२१ पासून

अर्ज www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर उपलब्ध

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com