
पुणे : अमित शाह (Amit Shaha) देशाचे गृहमंत्री आहेत की भारतीय जनता पार्टीचे घरगुती मंत्री आहेत, या शब्दात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात शाह यांच्यावर थेट टीका केली. राज्या-राज्यात जाऊन तोडफोडी करून सरकारे पाडणाऱ्या शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये लक्ष द्यावे, असा सल्लादेखील ठाकरे यांनी दिला.
सुमारे पाऊण तासाच्या भाषणात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. जीनाच्या थडग्यावर माथा टेकवणारे आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलावता केक खायल्या जाणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही.माझे वडिलोपार्जित हिंदुत्व माझ्याकडे आहे. हिंदुत्वापासून आम्ही तसूभरही दूर गेलो नाही, जाणार नाही हे लक्षात ठेवा, या शब्दात त्यांनी भाजपाला ठणकावले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कटप्पा असा करीत मी आजारी असताना या कटप्पाने पक्ष कापण्याचा प्रयत्न केला. वास्तविक यांना काय नाही दिलं. मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या सातजणांच्या यादीत एकनाथ शिंदे यांना स्थान दिले. मात्र, किती दिलं तरी यांची भूक भागत नाही. स्वत: मंत्री, मुलगा खासदार इतकं देऊनही हे आता पक्षावरच कब्जा करायला निघालेत. मात्र, त्यांचे हे स्वप्न एकनिष्ठ शिवसैनिक कधीच पूर्ण होऊ देणार नाहीत, असे ठाकरे यांनी सांगितले.
भाजपाने पाठीत वार केला म्हणून २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास मी आघाडीत गेलो. अमित शाह यांच्यासोबत जे ठरलं होतं ते त्यांनी पाळलं नाही. म्हणून नाईलाजाने आघाडीसोबत जावे लागले. शिवरायांच्या साक्षीने आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो जे ठरलं होतं ते पाळले नाही म्हणून मला आघाडीसोबत जावे लागले, असे ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ठाकरे यांनी जोरदार टीका केली.नियामत राहून भाषण करायला सांगत आहात. मात्र, कायदा आम्हालाही कळतो. कायद्याचा एकतर्फी वापर आम्ही करू देणार नाही. कायदा तुम्ही पाळला तरच आम्ही पाळू. आम्हाला कायदा पाळायला सांगून तुम्ही डुकरे पाळत आहात, अशी टोकाची टीका ठाकरे यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.