Uday Samant News : पाणी चोरीबाबत उद्योगमंत्री सामंतांनी टाकलेल्या रात्रीच्या धाडीत तथ्य नव्हते का ?

Kalyan Dombiwali : पाहणीनंतर 'त्या' ठिकाणी पाणी चोरी होत नसल्याचा पालिकेचा खुलासा
Uday Samant
Uday SamantSarkarnama

Water Issue in Kalyan Dombvili : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री डोंबिवलीतील संदप गावात अचानक धाड टाकत या ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची बाब उघडकीस आणली. संदप रोड परिसरात दोन टँकर पॉईंट व मिनरल वॉटर कारखान्यात पाणी चोरी होत असल्याचे सामंत यांना पाहणीत दिसून आले होते. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पालिका प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पाणी चोरीप्रकरणी चौकशी सुरु केली.

दरम्यान, पालिका प्रशासनाने संदप रोड परिसरातील तीन्ही ठिकाणची मंगळवारी पाहणी केली. या ठिकाणी जलवाहिनीतून पाणी चोरी होत नसून बोअरवेल मधील पाणी वापरले जात असल्याचा खुलासा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. पालिकेच्या या खुलाशामुळे आश्चर्य व्यक्त होत असून या सर्व प्रकारावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombiwali) २७ गावांत पाण्याची समस्या जटील झाली आहे. येथील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी उद्योगमंत्री सामंत (Uday Samant) यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी अचानक डोंबिवली (Dombvili) शहर गाठत सोमवारी मध्यरात्री संदप रोड परिसरातील पाईपलाईनची पहाणी केली.

यावेळी मिनरल वॉटर कंपनी व अन्य तीन ठिकाणी टँकरद्वारे पाणी चोरी होत असल्याची बाब त्यांनी उघड केली. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांची देखील सामंत यांनी कानउघडणी केली. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada) मिनरल वॉटर कंपनीचालक तसेच इतर दोन टँकर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकारानंतर पालिकेचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने संदप रोड परिसरात पाणी चोरी होत आहे का, याची पाहणी केली. मिनरल वॉटर प्लान्ट या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी बोअरवेलमधून पाणी वापरले जात असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले.

बोअरवेलची त्यांनी परवानगी घेतली आहे, ती कागदपत्र संबंधित मालक पालिका प्रशासनास सादर करणार आहेत. तसेच संदप रोड परिसरातच इतर दोन टँकर पॉईंटच्या ठिकाणी पाहणी केली. तेथे खदानी तसेच बोअरवेलमधून पाणी घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पाणी टँकरमध्ये भरले जात असल्याचे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सामंत यांची रात्रीच पडलेली धाड... पोलीस ठाण्यात तक्रार दाखल... त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांचा खुलासा पाणी चोरी झालीच नाही. या सर्व प्रकारांमुळे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीत काही तथ्य नव्हते का? याविषयी चर्चा होत आहे. त्यांच्या तक्रारीत तथ्य नव्हते तर मग सामंत (Uday Samant) यांनी रात्री पाणी चोरी होत असल्याचा दावा का केला? पालिका अधिकाऱ्यांना कसे काहीच आढळून आले नाही? असे अनेक प्रश्न या सर्व प्रकारावर उपस्थित केले जात आहेत.

याबाबत अधिकारी किरण वाघमारे म्हणाले, "तक्रारीनुसार संदप रोड परिसरातील तिन्ही ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. तिन्ही ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची कोणतीही बाब निदर्शनास आलेली नाही. याचा अधिक तपास सुरु आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com