''105 वर्षांपासून महाराष्ट्र संभाजीराजेंना 'धर्मवीर' म्हणून ओळखतो;पण कोल्हेंनी...''

Vishwas Patil Post Viral On Sambhaji Maharaj : आता विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ...
Vishwas Patil, Ajit Pawar, Amol Kolhe
Vishwas Patil, Ajit Pawar, Amol Kolhe Sarkarnama

Vishwas Patil Post Viral On Sambhaji Maharaj: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक आहे असं विधान हिवाळी अधिवेशनात केलं होतं. त्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेतेमंडळीही अजित पवारांच्या (Ajit Pawar) समर्थनार्थ मैदानात उतरले होते. यात शिरुरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा देखील समावेश होता. त्यानंतर विरोधकांच्या टीकेला स्वत: अजित पवारांनी देखील पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

मात्र, एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन वाद पेटला असतानाच ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

विश्वास पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे पाटील यांनी धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर भाष्य केलं आहे. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पोस्टमध्ये काय?

विश्वास पाटील पोस्टमध्ये म्हणतात, "संभाजीराजांना 'धर्मवीर' म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे! कागदपत्रे साक्ष देतात! 'स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सीरियलसाठी वापरले इतकेच..''

Vishwas Patil, Ajit Pawar, Amol Kolhe
Nitesh Rane : अजितदादांनी 'टिल्ल्या' म्हटल्याने नितेश राणे संतप्त ; टि्वट करुन दिलं 'हे' उत्तर

कोल्हेंकडून सिरीयलच्या उच्चांकासाठी 'स्वराज्यरक्षक'चा वापर

तसेच 'गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख "धर्मवीर" असाच करत आला आहे. ग.दि माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा "धर्मभास्कर" असा केला होता. अन्यथा "स्वराज्यरक्षक" हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही अशा शब्दांत पाटील यांनी कोल्हेंना टोला लगावला आहे.

सर्व कागदपत्रे पाहता हे दिसून येते की, संभाजीराजांनी आपल्या जीवनामध्ये हिंदू धर्मातील अवडंबर व वाईट चालीरीतीचा नक्कीच वेळोवेळी निषेध केला आहे. त्या नाकारल्या सुद्धा आहेत. वाहते पाणी धर्मानुसार अडवायचे नसते. पण राजांनी पहिल्यांदा विशाळगड भागात धरणाची कल्पना अमलात आणली. तात्पर्य त्यांनी हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती जरूर नाकारलेल्या होत्या. पण आपल्या हिंदूधर्माचा त्यांनी कधीही त्यांग केला नव्हता .

आज माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा हिंदू धर्मातील चातुर्वर्ण, कर्मकांडाचा अतिरेक आवडत नाही. पण म्हणून हिंदूधर्मच संपूर्ण वाईट आहे असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. तसेच संभाजी राजे आणि शिवाजी राजे हे "संपूर्ण हिंदू धर्मा"च्या विरोधी होते. शिवाय औरंगजेब आणि अफजलखान यांच्या क्रौर्र्याचे गाडीभर पुरावे असताना ते संतमहात्मे होते, असे जाहीरपणे सांगायचे महाराष्ट्र देशी जे प्रयोग चालू आहेत. ते पूर्णतः धक्कादायक आणि इतिहासबाह्य आहेत.

राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ...

'अस्सल कागदपत्रे सांगतात की, गेली 105 वर्ष महाराष्ट्र शंभूराजांना "धर्मवीर" या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः जे दानपत्र लिहून दिले आहे. आज-काल विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे असे खेदाने म्हणावे लागते असेही पाटील आपल्या पोस्टमध्ये लिहितात.

Vishwas Patil, Ajit Pawar, Amol Kolhe
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी घेतली शपथ; म्हणाले,''बायकोला सोडून कुणालाच...''

मी आजही माझ्या मतावर ठाम; अजित पवारांचं स्पष्टीकरण

आजपर्यंत मी माझ्या भाषणात कधीही महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली नाहीत. मी कोणतही वादग्रस्त विधान केलेलं नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत कोणताही अपशब्द वापरला नाही, इतिहासाच्या आधारावर मी हे विधान केलं आहे. मी आजही माझ्या मतावर ठाम आहे. तसेच संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in