वैभव नाईक यांनी सोमय्या यांना या चौकशीची करून दिली आठवण...

‘‘नारायण राणे यांच्या ५३ कोटींच्या बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी यापूर्वी केली होती.
वैभव नाईक यांनी सोमय्या यांना या चौकशीची करून दिली आठवण...
Narayan Rane, Kirit Somaya, Vaibhav Naik (21).jpg

कणकवली : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने परिवहनमंत्री अनिल परब यांना गुंतविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या ब्लॅकमेलिंग करीत आहेत. यापूर्वी मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याविरोधात ‘ईडी’च्या चौकशीचे पुढे काय झाले, असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केला. यापुढे सोमय्या मुख्यमंत्री व शिवसेनेवर असे बेछूट आरोप करीत राहिले तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर  नाईक म्हणाले, ‘‘शिवसेना आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी सोमय्या पुढे आले आहेत. अनिल परब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी वडिलोपार्जित घराची दुरुस्ती केली. त्यांची सिंधुदुर्गात या व्यतिरिक्त एकही मालमत्ता नाही. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या मागे जिल्ह्यातील जनता आहे. मुंबई महापालिकेत परब यांची ताकत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रकार सोमय्या यांच्याकडून होत आहे. आज सोमय्या यांनी कुडाळ येथील नवीन आगाराची पाहणी केली. कुडाळ येथील एसटी डेपोचे काम दोन कोटींचे होते आणि ज्या इंजिनियर कंपनीने हे काम केले ते कोणाच्या जवळचे आहेत, हे सर्वश्रुत आहे. दोन कोटींचे काम असेल तर अडीच कोटींचा घोटाळा कसा झाला?’’ असा सवाल नाईक यांनी केला.


ते म्हणाले, ‘‘नारायण राणे यांच्या ५३ कोटींच्या बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी यापूर्वी केली होती. नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बेनामी पैसे मनी लॉन्ड्रिंग झाले कुठून, यात कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी का थांबली? केवळ आरोप करण्यासाठी नीतेश राणेंनी सोमय्या यांना जिल्ह्यात आणले, मात्र शिवसेनेने त्यांना जशास तसे उत्तर दिले. ज्या सोमय्यांनी यापूर्वी राणेंवर ‘ईडी’च्या चौकशी मागणी केली होती, ती आता का थांबली? राणे भाजपमध्ये गेल्यावर संत झाले का? ‘ईडी’ने त्यांची प्रथम चौकशी करावी, यासाठी सोमय्या प्रयत्न करणार आहेत का?’’

शिवसेनेला बदनाम करण्याचे कारस्थान
 नाईक  पुढे  म्हणाले, ‘‘केवळ शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी सोमय्या आरोप करीत आहेत. याचे कारण म्हणजे गत निवडणुकीत शिवसेनेने त्यांना खासदारकीपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे त्या आकसापोटी सोमय्या आरोप करीत आहेत. नीतेश राणेंचा या मागील हेतू वेगळा होता; मात्र शिवसेनेने त्या व्हिडिओच्या माध्यमातून खरे जनतेसमोर आणल्याने सोमय्या यांच्या आरोपात काही तथ्य नाही. सोमय्या केवळ ब्लॅकमेलिंग करीत आहेत. शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी आरोप करीत आहेत. तुम्हाला जी काय चौकशी करायची असेल ती करा. आम्ही चौकशीला तयार आहोत.’’ असे नाईक म्हणाले. 

Related Stories

No stories found.