आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघातच शिवसेनेचा फुसका बार

उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
Aaditya Thackeray in UP
Aaditya Thackeray in UPSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशामध्ये (Uttar Pradesh) पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपने (BJP) बहुमताची मॅजिक फिगर पार करत सर्वच पक्षांना धूळ चारली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचेही (shiv Sena) 37 उमेदवार रिंगणात होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मैदानात उतरत प्रचारसभाही घेतल्या. पण ज्या मतदारसंघात सभा गाजवल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला, त्या मतदारसंघासह इतर ठिकाणीही शिवसेनेच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता येणार नाही, अशी स्थिती आहे. (UP Election 2022 Updates)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे उत्तर प्रदेशात यावेळी परिवर्तन होणार असल्याचा दावा करत होते. शिवसेनेचे जवळपास 60 उमेदवार मैदानात उतरवण्यात आले होते. पण अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने मैदानात 37 उमेदवार उरले. शिवसेना यंदा खातं उघडणार असंही नेत्यांकडून सांगितले गेले. त्यासाठी आदित्य ठाकरेंना प्रचारासाठी उतरवण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक नेते त्यांच्यासोबत होते. (UP Election Result News)

Aaditya Thackeray in UP
भाजपनं इतिहास रचला; योगी मोडणार 37 वर्षांची परंपरा

कोराँव मतदारसंघातील उमेदवार आरती कोल यांच्या प्रचारासाठी लडीयारी यथे आणि डुमरियागंजचे उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. सभेत बोलताना त्यांनी बदलाची लाट असल्याचा दावाही केला होता. योगी आदित्यनाथ निकालानंतर माजी मुख्यमंत्री होतील, असंही ते म्हणाले होते. पण निकालामध्ये या दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिटही वाचणार नाही, असंच चित्र आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, डुमरियागंज मतदारसंघात सहा फेरी अखेर शिवसेनेला 838 मतं मिळाली आहे. तर भाजपचा उमेदवार 13 हजार मतांसह आघाडीवर आहे. आरती कोल यांना पाचव्या फेरीअखेर 339 मतं मिळाली आहेत. भाजपचा उमेदवाराने दहा हजारांहून अधिक मतं मिळवत आघाडी घेतली आहे. अनुपशहर, लखनौ मध्य, हाथरस, कुंदरकी यांसह इतर मतदारसंघातही शिवसेनेच्या उमेदवारांना दुपारी बारा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 100 मतंही मिळालेली नाहीत.

शिवसेनेला एक टक्केही मतं नाहीत

दुपारी बारा वाजेपर्यंतच्या मतमोजणीमध्ये शिवसेनेला एक टक्केही मतं मिळालेली नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारा वाजेपर्यंत शिवसेनाला केवळ 0.02 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात शिवसेनेचा सुफडा साफ होणार, असंच चित्र आहे.

भाजपनं गाठली मॅजिक फिगर

भाजपने 202 ची मॅजिक फिगर पार केल्याचे सुरूवातीच्या कलांनुसार दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानुसार राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत भाजपचे 241 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या राज्यात मागील 37 वर्षात कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. ही परंपरा मोडित निघणार असून योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com