मुख्यमंत्री ठाकरेंनी मागितली जाहीर माफी तर पंतप्रधान मोदींना अतीव दु:ख...

भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
uddhav thackeray announces 5 lakhs for families of sunrise hospital fire victims
uddhav thackeray announces 5 lakhs for families of sunrise hospital fire victims

मुंबई : भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 10 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांची माफी मागितली आहे तर बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल अतीव दु:ख व्यक्त केले आहे. 

भांडूप येथील ड्रीम मॉल मध्ये काल (ता.25) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात त्यावेळी ७६ रुग्ण दाखल होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.  अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक रुग्णांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. रुग्णालयाला आग लागल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची माफी मागितली आहे. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे.  या घटनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. मागील वर्षी आलेल्या पहिल्या लाटेनंतर आता संसर्गाची दुसरी लाट आली आहे. मुंबईत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्राथमिक चौकशीनुसार ही आग मॉलमधील एका दुकानात लागली आणि नंतर ती रुग्णालयात पोचली. यात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. त्यांना शिक्षा ही होईलच. 

आपण गेल्या वर्षीपासून कोरोनाचा सामना करीत आहोत. कोरोनाचा संसर्ग पहिल्यांदा सुरू झाला त्यावेळी आपल्याकडे अतिशय कमी बेड होते आणि व्हेंटिलेटरही कमी होते. परंतु, आपण आपला लढा कायम ठेवून तात्पुरती रुग्णालये स्थापन केली. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या रुग्णालयाला तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. या रुग्णालयाचा परवाना 31 मार्चला संपणार होता.  

पंतप्रधान मोदींना अतीव दु:ख 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. या घटनेची माहिती समजताच त्यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील रुग्णालयात लागलेल्या आगीत प्राणहानी झाल्याचे ऐकून मला अतीव दु:ख झाले. यात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना मी करतो. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com