
Rahul Narwekar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यावरुन विधानसभेतच एकच गदारोळ उडाला आहे. भाजप व शिवसेना आमदार आक्रमक झाले आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत राऊतांवर हक्कभंगाची कारवाईची जोरदार मागणी केली आहे. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राऊत यांच्या विधानाचा शहानिशा करुन येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल असं निर्णय जाहीर केला आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, सभागृहात उपस्थित करण्यात आलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कामकाजावर प्रतिकूल परिणाम करणारा आहे. राऊत यांचं विधान सभागृहाचा, सभागृहातील सदस्यांचा अन् पर्यायाने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं माझं प्राथमिक मत आहे, संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत येत्या दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर हक्कभंग कारवाईवर निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले आहेत.
सदस्यांच्या विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संविधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. म्हणून येत्या दोन दिवसांत संबंधित प्रकरणाची चौकशी करुन ८ मार्च २०२३ रोजी पुढचा निर्णय जाहीर करेन असंही नार्वेकर म्हणाले. यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी राऊतांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर महाराष्ट्र द्रोह केला आहे. उद्या कुणीही सभागृहातील सदस्यांना काहीही म्हणेल. त्यामुळे आताच जरब बसणे आवश्यक आहे असं आशिष शेलार म्हणाले.
त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेलार यांचं समर्थन केलं. याचवेळी माजी मंत्री काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांच्या विधानाशी असहमत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचं दिसून आलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. बोटचेपी भूमिका घेऊ नका. विधिमंडळाच्या अपमानाबाबत अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.
अजित पवारांचं शेलारांना समर्थन...
आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या. कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर एक बातमी आली आहे. एका व्यक्तीने विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं. शेलार यांच्या मताशी सहमत आहे.
पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला. पण काहीही बोलणं योग्य नाही. जे बोलले ते खरोखरच बोलले आहे का? त्यात तथ्य आहे का? जे बोलले त्यांची बाजू घेत नाही. पण शहानिशा केली पाहिजे. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता कामा नये. पण ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे असं अजित पवार म्हणाले.
चोरमंडळ म्हणणं आम्हाला मान्य नाही...
बाळासाहेब थोरात म्हणाले, कुणीही असो विधिमंडळ सर्वोच्च सभागृह आहे. थोर परंपरा असलेलं सभागृह आहे. त्याचा अभिमान सर्वांना आहे. खरंच तसं म्हटलं की नाही ते तपासून पाहिलं पाहिजे. सध्याच्या काळात शब्दांचा वापर दोन्ही बाजूने होतो. अध्यक्ष महोदय चोर मंडळ म्हणणं योग्य नाही. तसंच विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही. शब्दांचा वापर सर्वांनीच योग्य पद्धतीने केलं पाहिजे. चोर मंडळ म्हणणं आम्हाला मान्य नाही असंही थोरात यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.