मुंबई : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधकांवर चांगलेच भडकले. 'त्यांच्याकडे ही माहिती कुठून येते? सर्जिकल स्ट्राईक वगैरे गोष्टी त्यांना कशा कळतात? त्यांचे ज्ञान अगाध असून कसली विद्या वगैरे प्राप्त असेल. त्यांना संयमाची लस टोचण्याची गरज आहे,' असा टोला त्यांनी लगावला.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी संशय व्यक्त केला आहे. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ही आग लागली की लावली, असे म्हणत आगीच्या चौकशीची मागणी केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीबद्दल मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत माहिती देत असताना त्यांना विरोधकांच्या घातपाताच्या संशयाबद्दल विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ही माहिती कुठून येते, असा सवाल उपस्थित केला. यावेळी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच त्यांना संयमाची लस टोचण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
अर्णब गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून सध्या वादंग निर्माण झाले आहे. सर्जिकल स्ट्राईकची माहिती आधीच मिळाल्याचे गोस्वामी यांच्या काही व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आले आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे.
काय म्हणाल्या मुक्ता टिळक...
कोविड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे, असे आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचेही टोपे यांनी सांगितले.
सहा मजली असलेल्या या इमारतीत मोठे स्वरूप धारण केले. चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे पंधरा बंब गेले होते. आग विझल्यानंतर सहाव्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही या माहितीला दुजोरा दिला. मृत झालेले हे बांधकाम मजूर असण्याची शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मांजरी येथील कंपनीच्या इमारतीला बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती. कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे, तो भाग सुरक्षित आहे. आग लागल्यानंतर सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले जात होते. जिवितहानी न झाल्याबद्दल सिरमचे व्यवस्थापकीय संचालक आदर पूनावाला यांनी समाधान व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात पाच जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
Edited By Rajanand More

