
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यानंतर आता मुंबईमध्ये देशभरातील बिगर-भाजपा मुख्यमंत्र्यांना एकत्र आणले जाणार आहे, त्यासाठी राज्यात हालचाली सुरु झाल्या आहेत, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. हे शक्य न झाल्यास काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून बिगर काँग्रेसी नेता युपीएचे नेतृत्व करेल, यासाठीही प्रयत्न करत आहेत.
संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची परिषद होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपची सत्ता नसलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज या पत्रात अधोरेखित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात याबाबत चर्चा झाली असून मुंबईत असे संमेलन आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न यासह विविध मुद्द्यांवर आगामी बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचवेळी त्यांनी देशातील १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रावरही भाष्य केलं. ''देशभरात सुरु असलेल्या या सामाजिक, धार्मिक तणावाबाबत देशातील १३ विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान यांना निवेदन केले. पंतप्रधान या घटनांवर शांत का आहेत, असी विचारणा या नेत्यांनी पत्रातून केली आहे. जर देशातील १० राज्यामंध्ये रामनवमीला दंगे होत असतील तर देशाच्या पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला आवाहन केले पाहिजे. सामजिक सलोखा, राष्ट्रीय एकतेवर बोलायला हवे, जर पंतप्रधानांचे या हिंसेला समर्थन नसेल तर त्यांनी समोर येऊन जनतेशी बोलले पाहिजे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं. 'राजकीय फायद्यांसाठी, निवडणूका जिंकण्यासाठी तुम्ही जे करत आहात ते देशासाठी घातक आहे. कालही दिल्लीत हमुनान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणूकीवर जो हल्ला झाला, तसा यापूर्वी कधीही झाला नव्हता. पण आज देशात निवडणूका (Election) जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, काल दिल्लीत (Delhi) मिरवणूकीवर झालेला हल्ला हो पूर्वनियोजित होता.'' असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.