अतुलनीय काम करणाऱ्या मंत्र्याच्या अघोषित खासगी सचिवाचा प्रताप; मंत्रालयातील अधिकारीही चक्रावले

Mumbai News : कागदोपत्री सुनावणी प्रक्रिया पूर्ण करुन 'डीई' निकाली काढली जात आहे.
mantralaya News
mantralaya NewsSarkarnama

Mumbai News : राज्य सरकारमधील (State Government) एका वजनदार मंत्र्याकडे कार्यरत अघोषित खासगी सचिवाचे विभागाअंतर्गत चौकशी निकाली काढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न पाहून मंत्रालयीन प्रशासनाने डोक्याला हात लावला आहे.

संबंधित अधिकार्याने कायदेशीर प्रक्रियेलाच काखेत मारले आहे. विभागीय आयुक्तांनी फेटाळलेल्या प्रकरणात राज्यपालांकडे (Governor) अपील न करता संबंधिताने प्रक्रियेला वळसा घालून मूळ विभागाच्या मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. आता त्यावर कागदोपत्री सुनावणी प्रक्रिया पूर्ण करुन 'डीई' निकाली काढली जात आहे. सध्या हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. मात्र, ही प्रक्रियाच पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची जोरदार चर्चा सध्या मंत्रालयात सुरु आहे.

mantralaya News
Gujrat Election 2022 : भाजपचा आक्रमक पवित्रा; मोदी-शहांसह 'हे' ४७ नेते मैदानात

संबंधित अधिकारी मराठवाड्यात (Marathwada) उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी एका प्रकरणात त्यांची विभागाअंतर्गत चौकशी (डीई) सुरु झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागीय आयुक्त कार्यालयात ही चौकशी सुरु होती. सध्या राज्यातील नव्या सरकारमध्ये वजनदार मंत्र्यांकडे ते खासगी सचिव (प्रायव्हेट सेक्रेटरी PS) म्हणून कार्यरत आहेत. मंत्रालयात मंत्री आस्थापनेवर 'पीएस' म्हणून काम करायचे झाल्यास मंत्री स्वतः च्या लेटरहेडवर अधिकार्याच्या नावासह त्यांची पीएस म्हणून नियुक्ती करावी, अशा आशयाचे शिफारस पत्र सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवतात. त्यासोबत इच्छूक अधिकार्यास सामान्य प्रशासन विभागाकडे 'डीई' सुरु नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यानंतरच सामान्य प्रशासन विभागाकडून 'पीएस' म्हणून नियुक्ती होते.

मात्र, संबंधित अधिकार्याची डीई सुरु असल्याने अधिकृतपणे त्यांची खासगी सचिव म्हणून नियुक्ती झालेली नाही. गेली ३ महिने सामान्य प्रशासन विभागाकडे ही नियुक्ती प्रलंबित आहे. तरी सुद्धा अघोषित खासगी सचिवाची जबाबदारी तेच सांभाळतात आहेत.

अशा परिस्थितीत फारकाळ काम करता येणार नसल्याने संबंधित अधिकार्याची डीई निकाली काढण्याची लगीनघाई सुरु आहे. त्यासाठी त्यांनी अक्षरश: गुडघ्याला बाशिंगच बांधले आहे. सुरुवातीला त्या अधिकार्याने मंत्र्यांमार्फत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील मोठ्या अधिकार्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. विभागीय आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाला बधले नाहीत. त्यांनी 'डीई' संदर्भात विरोधी निर्णय दिला.

अशा स्थितीत संबंधितास राज्यपालांकडे अपील दाखल करावे लागते. अशा अपीलावर विचार करुन राज्यपाल राज्य सरकारमधील एखाद्या मंत्र्याकडे हे प्रकरण सुनावणीसाठी पाठवतात, हीच कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यानंतर संबंधित मंत्री प्रकरणाची सुनावणी घेतात व सोईनुसार 'निर्णय' दिला जातो.

mantralaya News
Bharat Jodo : विस्कटलेले दलित, मुस्लीम, आदिवासी आणि ओबीसी ही यात्रा जोडेल का?

मात्र, ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने संबंधित 'पीएस'ने या लांबलचक आणि वेळखाऊ प्रक्रियेलाच काखेत मारले आहे. राज्यपालांकडे अपील न करता संबंधिताने प्रक्रियेला वळसा घालून मूळ विभागाच्या मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. आता त्यावर कागदोपत्री सुनावणी प्रक्रिया पूर्ण करुन 'डीई' निकाली काढली जात आहे. सध्या हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. मात्र, ही प्रक्रियाच पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची जोरदार चर्चा सध्या मंत्रालयात सुरु आहे.

या आधीच्या काळात मंत्रालयीन उपसचिव किंवा अव्वर सचिव हेच मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम करत होते. अलीकडे काही वर्षांत महसूल अधिकार्यांचा याकडे ओढा वाढला आहे. एखादे बरे खाते असलेल्या मंत्र्याचा खासगी सचिव चांगलाच मलिदा कमावतो, अशी चर्चा असते. त्यामुळे खासगी सचिव नियुक्तीमागे अर्थकारण हा महत्त्वाचा भाग मानला जातो. दुसरे म्हणजे, क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी म्हणून उलटसुलट काम करणाऱ्यांमागे चौकशांचा ससेमिरा लागतो. मंत्री आस्थापनेवर येऊन अशा चौकशा निकाली काढण्यासाठी सुद्धा काही अधिकारी प्रयत्न करीत असतात. उपरोक्त अघोषित खासगी सचिव याचे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in