राणा दाम्पत्याची सुटकेसाठी धावाधाव अन् सोळा शिवसैनिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Shiv Sena WorkersSarkarnama

राणा दाम्पत्याची सुटकेसाठी धावाधाव अन् सोळा शिवसैनिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा

'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

मुंबई : 'मातोश्री'समोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान देणारे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे सध्या तुरूंगात आहेत. त्यांच्या खार येथील घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पण या सर्वांची न्यायालयाने सोमवारी जामीनावर सुटका केली आहे. तर दुसरीकडे आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना जामीनासाठीही आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तुरूंगात राहावे लागेल. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी विविध मुद्दांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणांना १४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या वकिलांनी लगेच जामीनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

Shiv Sena Workers
राष्ट्रवादीची ‘हनुमान’ उडी; थेट मोदींच्या घरासमोर करायचंय चालीसा पठण, नेत्याचं शहांना पत्र

तर दुसरीकडे राणांच्या खार येथील घरासमोर शिवसैनिकांनी शनिवारी जोरदार आंदोलन केलं होतं. यादिवशी जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी सोळा जणांना अटक केले होते. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सर्वांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांची मुंबई पोलिसांकडून सुटका केली जाईल.

दरम्यान, रविवारी न्यायालयाने राज्य सरकारला 27 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यानंतर या अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राणा दाम्पत्याला तुरूंगातच राहावे लागणार आहे. त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रविवारी म्हटले होते. त्यानुसार राणा दाम्पत्याच्या वतीने सोमवारी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल : प्रदीप घरत

सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता सरकारला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'' राणांचे वकीस रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला आणि पोलिस कोठडी देण्यासही विरोध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.