मला बळीचा बकरा बनवलं जातंय! वाझेंचा विशेष न्यायालयात खळबळजनक दावा

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी एनआयएने केली आहे.
suspended api sachin vaze says he is being made a scapegoat
suspended api sachin vaze says he is being made a scapegoat

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांच्या कोठडीची मुदत 15 दिवस वाढवावी, अशी मागणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयात केली. या वेळी वाझेंनी त्यांना बळीचा बकरा बनवले जात असल्याचा दावा न्यायालयात केला. 

वाझेंच्या एनआयए कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे त्यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीची मुदत 15 दिवस वाढवावी, अशी मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली. मला बळीचा बकरा बनवले जात आहे, असा दावा वाझेंना न्यायालयासोर सुनावणीदरम्यान केला. तपास अधिकारी म्हणून केवळ दीड दिवस या प्रकरणाचा तपास केला. केवळ मीच नव्हे तर गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या पथकानेही या प्रकरणाचा तपास केला आहे, असेही वाझे यांनी न्यायालयात सांगितले. 

एनआयएच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, वाझेंचा गुन्हा हा देशपातळीवरील एक मोठा गुन्हा आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास होणे हे महत्वाचे आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा अशा गुन्ह्यात सहभाग असणे ही शरमेची बाब आहे

यावर वाझेंचे वकील म्हणाले की, वाझेंबाबत  एनआयएकडे ठोस पुरावे नाहीत. कारण त्या गाडीत फक्त जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. डिटोनेटरशिवाय त्या कांड्या विस्फोटक मानल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत नोंदवलेली कलमे चुकीची आहेत. 

दरम्यान, सचिन वाझे, बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदे, बुकी नरेश गोरे व अन्य काही जणांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एनआयएचे अधिकारी या सर्वांचे डीएनए नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या गाड्यांमधून न्यायवैद्यक पथकाला मिळालेल्या पुराव्यामधील डीएनए व संशयित आरोपींचे डीएनए यांची पडताळणी करण्यात येणार आहे. हा अहवाल एक ते दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोन मर्सिडिज, एक इनोव्हा वापरली गेली, असा संशय आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्होल्व्हो व प्राडो या दोन गाड्यांमधूनही नमुने न्यायवैद्यक पथकाने घेतले आहेत. 

दरम्यान, वाझे ज्या विभागात नेमणुकीला होते त्या सीआययू पथकाला बार आणि हॉटेलवर कारवाईचे अधिकार नव्हते. मात्र, गुन्हा घडला त्या ठिकाणी आपण उपस्थित नव्हतो हे दर्शवण्यासाठीच वाझेंनी डोंगरीत हॉटेलवर कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर त्यांची ओळख पटू नये म्हणून अंगावरील सर्व मौल्यवान वस्तू काढून घेऊन त्यांची हत्या लुटीच्या कारणासाठी झाल्याचा बनाव संशयित आरोपींनी रचला. पुरावा नष्ट करण्यासाठी हिरेन यांच्या दुकानातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर वाझेंच्या पथकातील पोलिसांनी २७ तारखेलाच काढून नेत त्या ठिकाणी नवीन डीव्हीआर आणून लावला, अशीही माहिती तपासात समोर येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com