सगळेच आनंद दिघे नसतात,काही शिंदे असतात; 'सामना'तून एकनाथ शिंदेंची पोलखोल...

Shivsena : अशा बाजारबुणग्यांनीच इतिहास काळात मराठा साम्राज्य लयास नेले.
Anand Dighe & Eknath Shinde Latest News
Anand Dighe & Eknath Shinde Latest News Sarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांची शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीत आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच 'दिघे' होता येत नाही. काहीजण 'शिंदे' होतात. दिघे नक्की कोण होते? आणि त्यांचे विचार कसे होते, असे आजच्या सामनाच्या रोखठोक सदरातून सांगत शिवसेनेने (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पोलखोल केली असून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यावर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता तर त्यांच्या गटाकडून शिवसेनेवरच दावा करण्यात आला आहे. यावरून आजच्या अग्रलेखात त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि या पाठीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबत शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे विचार काय होते? आणि त्यांची निष्ठेची व्याख्या काय होती हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या रोखठोक सदरातून करण्यात आला आहे. (Anand Dighe & Eknath Shinde Latest News)

Anand Dighe & Eknath Shinde Latest News
केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी पुण्यातील 'त्या' दुर्घटनेची आठवण करून देत दिला सल्ला...

अग्रलेखात म्हटले आहे की, एकनाथ शिंदेंनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते, अशी थाप हे लोक मारत आहेत. मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत असत. या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते. ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते. त्यावेळी व नंतरही दिघे यांचे प्रभाव क्षेत्र ठाणे जिल्ह्याच्या बाहेर नव्हते, पण आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यात तेव्हा अनेकांना पडली होती. त्याग, निःस्वार्थी भावना व शिवसेनेवरील अढळ श्रद्धा ही त्यांची राज्यात ओळख होती. त्यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यपद्धतीवर अनेकदा छापून आले, पण दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय ती चुकीची आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

Anand Dighe & Eknath Shinde Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

एकनाथ शिंदेंनी आज हयात नसलेल्या स्व. दिघे यांचा आधार घेतला असून दिघे यांची आठवण त्यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ हा सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च ते स्वतःच्या प्रसिद्धीवर करत आहेत. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा सवालही हा सिनेमा पाहून अनेकांना पडला असल्याची टीकाही करण्यात आली आहे. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित आहेत. या चित्रपटानंतर शिंदेंनी दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

शिंदे हे दिघे यांच्या नेमके किती जवळ होते, हे राजन विचारेच सांगू शकतील. दिघे यांच्या अपघाती मृत्यूचा शिंदे यांनी फायदा करून घेतला. मो. दा. जोशी हे शिवसेनेचे ठाण्यातील पहिले आमदार होते. अर्थात जोशी हे शिवसेनाप्रमुखांचे ठाण्यातील निकटवर्तीय आणि आनंद दिघे यांचे राजकीय गुरू. मो. दा. जोशी दिघ्यांना ‘अरे-तुरे’ असे प्रेमाने एकेरीत म्हणत. ते ठाणे जिल्हाप्रमुखसुद्धा होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर समीकरण बदलले. मो. दां.च्या जागी राजन विचारे ठाण्याचे आमदार झाले. पुढे विचारे खासदार झाले. तेव्हा त्या जागी शिवसेनेचे ठाणे शहरप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवले. त्यास शिंदे यांनी कडाडून विरोध केला व काँग्रेसमधून आयत्या वेळी आलेल्या रवी फाटक यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. फाटक हे स्थानिक नव्हते, पण वागळे इस्टेट भागात स्वतःस त्रास होऊ नये म्हणून म्हस्के यांच्या जागी काँग्रेसचे फाटक लादले. ही जागा तेव्हा शिवसेनेने गमावली ती शिंदे यांच्यामुळेच, हे फाटक राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते व ठाण्यातील शिवसैनिकांची डोकी त्यांनी फोडली होती. हा प्रसंग बोलका आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या डॅाक्टर मुलाला शिवसेनेच्या मुलाला उमेदवारी द्यायला भाग पाडले, असा आरोप केला आहे.

Anand Dighe & Eknath Shinde Latest News
शिंदे गटात गेलेल्या 'या' आमदार, मंत्र्यांना सत्ता काही मानवेना...

दरम्यान, शिंदे आज शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करतात. आनंद दिघे यांचा हा सगळय़ात मोठा अपमान आहे. शिंदे हे खरंच हिमतीचे असतील तर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी. ‘‘तुम्ही फुटा. न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून हवे ते निकाल मिळवून देतो’’, या दिल्लीतील महाशक्तीच्या आश्वासनानंतरच शिंदे व त्यांचे 40 मिंधे यांनी फुटण्याचे धाडस दाखवले. शिंदे यांच्या बरोबर जे ‘आमदार’ आहेत त्यातले किती खरे शिवसैनिक आहेत? या बनावट लोकांच्या पाठिंब्यावर ते माझीच शिवसेना खरी असा दावा करतात हे हास्यास्पद आहे. अब्दुल सत्तार, उदय सामंत, सरनाईक, शहाजी पाटील, तानाजी सावंत, शिवाय ‘ईडी’ पीडित इतर आमदार यांना कोणी शिवसैनिक म्हणायला धजावेल काय? अशा बाजारबुणग्यांनीच इतिहास काळात मराठा साम्राज्य लयास नेले. हे बाजारबुणगेच मोगलांना फितूर झाले व त्यांनीच संभाजीराजांचा वध घडवून आणला.

आनंद दिघ्यांच्या भोवती अशा बाजारबुणग्यांचे कोंडाळे कधीच दिसले नाही. कल्याण सिंगांना हिंदुहृदयसम्राट म्हटले हा बाळासाहेबांचा अपमान या चिडीतून दिघे यांनी संपूर्ण भाजपच अंगावर घेतला होता. शिंदे हे त्या दिघ्यांचे शिष्य शोभतील काय? आज ते शिवसेनेचा समांतर दसरा मेळावा घ्यायला निघालेत. चार हजार एसटी गाडय़ा गर्दी जमवण्यासाठी भाडय़ाने घेणार आहेत. पुन्हा इतर खर्च वेगळाच. कुठून येते ही आर्थिक ताकद? आनंद दिघे यांना हे उपद्व्याप कधीच करावे लागले नाहीत. त्यांना मोह नव्हता. त्यांची शिवसेना निष्ठा हे ढोंग नव्हते. ते खरेच मनाने व कर्तृत्वाने महान होते. दिघे धार्मिक होते… अघोरी नव्हते. दिघे वायफळ बोलत नव्हते. माणसे विकत घेऊन राजकारण करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. दिघे कुणी तत्त्वज्ञ नव्हते. गरीब, अन्यायग्रस्तांना मदत करणारा ते मसिहा होते. आनंद दिघे यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्हय़ाची जबाबदारी होती, पण त्यांच्या त्यागाची व निष्ठेची कवने संपूर्ण राज्यात गायली जात होती. दिघे माणसांना ‘पैशात’ म्हणजे खोक्यात तोलत नव्हते. ते आज त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे शिंदे करीत आहेत. शिंदे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात एक चटकदार वाक्य आहे ते असे, ‘‘राजकारणात सगळेच सारखे नसतात. काही आनंद दिघे असतात!’’त्याच धर्तीवर आता सांगता येईल. सगळय़ांनाच दिघे बनता येत नाही. काही शिंदेही बनतात!

शिंदे यांचा दसरा मेळावा म्हणजे चोरांचे संमेलन ठरेल! त्यात दिघ्यांचे नाव घेणे हा त्या पुण्यवान माणसाचा अपमान ठरेल! अशा शब्दात शिंदेंना सुनावले आहे. तर शिंदे व त्यांच्या लोकांनी अजूनही विचार करायला हवा. दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र फुटला हे चित्र देशासमोर जाऊ नये. लोकभावना पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूनेच आहे; शिवसेना एकच आहे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com