
Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाडा पिंजून काढला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले असतानाच, पुढील आठवड्यातील राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होणार आहे. ही बैठक १६ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होण्याची शक्यता असून, या बैठकीत मराठवाड्याच्या दृष्टीने मोठे निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. (Latest Marathi News)
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सात वर्षानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी मुंबईत होत असलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी मराठा असे आरक्षण देता येते का? या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या सोबतच मराठवाड्यातील मागासलेपणा दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली होती. त्यावेळी घेतलेल्या किती निर्णयाची अंमलबजावणी झाली? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.