परळ एसटी डेपोत आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह तर आंदोलनातील चौघे बेपत्ता असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनावरून राज्यभरात गदारोळ उडाला आहे.
ST Strike News Updates
ST Strike News UpdatesSarkarnama

मुंबई : एस.टी. कामगारांनी विलीनीकरणाची मागणी करत काल (ता.8) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता. यानंतर राज्यभरात गदारोळ उडाला आहे. यातच परळ एसटी (ST) डेपोजवळ एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कालच्या प्रकारानंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवले आहे. तेथून चार कर्मचारी बेपत्ता झाल्याचा दावाही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

परळ डेपोजवळ मृतावस्थेत आढळलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव महेश लोले, असे आहे. लोले हे एसटीमध्ये वाहक होते. परळ एसटी डेपोजवळ ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लोले हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी चार दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांचा मृतदेह आढळला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. ते काल दादर परिसरात असल्याचे यातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोले यांचा मृतदेह आज पहाटे आढळला. ते कोल्हापूरमधील रहिवासी होते. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा अथवा जखमा आढळेलल्या नाहीत. लोले यांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. हा अहवाल हाती आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. लोले यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले असून, त्यांचा मृतेदह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

ST Strike News Updates
कोरोनाच्या बूस्टर डोसची मोहीम सुरू होण्याच्या 24 तास आधी जनतेला मिळाली 'गुड न्यूज'

चार कर्मचारी बेपत्ता

पवारांच्या घराबाहेर गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढले आहे. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांनी घरी जाण्याची विनंती केली होती. या दरम्यान, एसटीचे चार कर्मचारी गायब झाल्याचा दावा काही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यांचा शोधही कमर्चारी घेत आहेत. पोलिसांकडून या कर्मचाऱ्यांची खातरजमा केली जात आहे.

ST Strike News Updates
कोरोना लशीचा बूस्टर डोस घेताय? अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा

ठाकरेंकडून पोलीस आयुक्तांची झाडाझडती

पवारांच्या घरावरील गृह विभागाच्या अपयशाचा मुद्दा सर्वपक्षीय नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. गृह विभागाबाबत एवढा गदारोळ सुरू झाल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ठाकरेंनी आज थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवासस्थानी तातडीनं बोलावून घेतलं आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांकडून पांडे यांची झाडाझडती घेण्यात आल्याचे समजते. याचवेळी गृहमंत्र्यांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांनीच पोलीस आयुक्तांनी बोलावून घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com