धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मांनी माघार घेण्यामागील नेमकं कारण काय... - singer renu sharma withdraws her complaint against dhananjay munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मांनी माघार घेण्यामागील नेमकं कारण काय...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने मोठा गदारोळ उडाला होता. 

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावरील राजकीय आणि कायदेशीर संकट टळले आहे. रेणू शर्मा यांनी ही तक्रार मागे घेण्यामागील नेमकं कारण काय याची चर्चा सुरू झाली आहे. यामागील खरं कारण राजकीय असल्याची चर्चा सुरू आहे.  

रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली आहे. याबद्दल त्यांनी ट्विट करुन यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. एका मोठ्या राजकीय षडयंत्राची मी शिकार होत असल्याची जाणीव मला झाली होती. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय यांना लक्ष्य करत होते आणि हे चुकीचे असल्याचे मला समजत होते, यामुळे हा निर्णय घेतल्याचे रेणू शर्मांनी म्हटले आहे.  

मुंडे यांच्यावरील आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. भाजपसह इतर विरोधी पक्षांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र, भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मांवरच आरोप केले होते. यामुळे विरोधकांच्या मागणीतील हवाच निघून गेली होती. याचबरोबर राष्ट्रवादीही मुंडे यांच्यामागे भक्कमपणे उभी राहिली होती. मुंडेवर आरोप केल्यानंतर रेणू शर्मा याच काही दिवसांना लक्ष्य होऊ लागल्याचे उलट चित्र दिसत होते. यामुळे त्यांनी माघार घेण्यामागे हेच कारण असल्याची चर्चा आहे. 

धनंजय आणि त्यांच्या द्वितीय पत्नी करुणा (रेणू यांची बहीण) यांच्यात मतभेद असून त्यावरून न्यायालयात खटलाही सुरू आहे. त्यामुळे मी मानसिक तणाव आणि दबावाखाली होते.या प्रकरणात मी घरातील कोणत्याही व्यक्तीचे नाव घेत नाही. कारण मला घरातील मंडळींशी नाते खराब करायचे नाही. धनंजय यांच्याविरुद्धची तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे, असे रेणू शर्मांनी म्हटले आहे. त्यांनी राजकीय षडयंत्राला जोड म्हणून कौटुंबिक कारण दिले असले तरी त्यामागील राजकीय कारणच मोठे असल्याचे दिसत आहे. 

धनंजय यांनी मला कधीही लग्नाचे वचन दिले नव्हते की बलात्कार केला नव्हता, असेही त्यांनी यात म्हटले आहे. त्याबद्दलचे कसलेही फोटो किंवा व्हीडओ नाहीत. कारण असे कधी घडलेच नव्हते. त्यामुळे मुंडे यांच्याविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही आणि मी हा खुलासा पूर्णपणे शुद्धीत करत आहे, असेही शर्मा यांनी शेवटी म्हटले आहे. अखेर मुंडे यांच्यावरील आरोप मागे घेऊन रेणू शर्मांनी या प्रकरणावर पडदा टाकला आहे. यामुळे मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवरील संकटही अखेर टळले आहे. 

शर्मा यांनी केलेल्या आरोपामुळे मोठे वादळ उठले होते. धनंजय यांनाही आपले दुसरे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे जाहीरपणे सांगावे लागले होते. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र त्यातून ते सहीसलामत सुटल्याचे दिसून येत आहे. दोन मुलांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपविल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख