पद देताना पैश्यांपेक्षा निष्ठाही बघा : अडगळीतील शिवसैनिकांचा ठाकरेंना सल्ला

Shivsena | Uddhav Thackeray | नव्याने शिवसेनेत आलेल्यांना पायघड्या टाकल्या जात आहेत
Uddhav thackeray
Uddhav thackeray Sarkarnama

वसई-विरार : शिवसेनेमधील ऐतिहासिक बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून पक्षांमध्ये काही अंतर्गत बदल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र याच बदलांवरून आता जुन्या शिवसैनिकांमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. या बदलामध्ये जुन्या शिवसैनिकांना डावलून नव्याने शिवसेनेत (Shivsena) आलेल्यांना पायघड्या टाकल्या जात आहेत, अशी खंत बोलून दाखविली जावू लागली आहे.

वसईतील शिवसैनिक मिलिंद चव्हाण यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना खुले पत्र पाठवतं ही खंत बोलून दाखविली आहे. या पत्रात शिवसेनेचे तत्कालिन नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अवघ्या वर्षभरापूर्वी बहुजन विकास आघाडीतून आणलेल्या नेत्याच्या हाती जिल्हा प्रमुखपद दिल्याने निष्ठावंतांमध्ये चलबिचल झाली असल्याचे म्हटलं आहे. मिलिंद चव्हाण यांच्या या पत्रानंतर बंडानंतही शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

मिलिंद चव्हाण यांनी या पत्रात म्हटले आहे कि, राजकीय घडामोडींवर शिवसैनिकांना उद्देशून तुम्ही म्हटले होते की, "तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच शिल्लक नाही, ज्यांना दिले ते सोडून गेले". पण साहेब स्वर्गीय बाळासाहेब (Balasaheb Thackeray) यांनी आम्हाला शिवसैनिक म्हणून ओळख देऊन अन्यायाविरोधात लढण्याची ताकद दिली ती अनमोल आहे. स्वर्गीय बाळासाहेब आणि तुम्ही नेत्यांना भरभरून दिले. परंतु अशा नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या कार्याचा आलेख न पाहता शिवसेनेची पदे स्वतःच्या घरात आणि त्यांची तळी उचलणाऱ्यांनाच दिली. परंतु शिवसैनिक नाउमेद होऊन पक्षांपासून दूर झाला नाही. बऱ्याच वेळा ज्यांना भरभरून दिले तेच पक्ष सोडून गेले.

पालघर, भिवंडी, विक्रमगड याठिकाणी जुन्या नेत्यांना पदनियुक्ती देऊन पक्ष उभारणीची संधी दिली व आणखी बंडाळी होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेतली. तशी वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात देखील सहसंपर्कप्रमुख पद नेमणे आवश्यक आहे. जेणेकरून जे गेले आहेत त्यांच्या ठिकाणी पर्यायी नेतृत्व तयार करत असताना पक्षातर्गत बंडाळी होणार नाही.

अन्यायविरोधात बोलणारा आणि लढणारा शिवसैनिक स्वर्गीय बाळासाहेब यांना अपेक्षित होता, म्हणून एक बाब तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. जिल्हाप्रमुख पद हे आपण जाहीर केले. आपला आदेश आमच्यासाठी अंतिम आहे परंतु पक्षांकडे जुने-जाणते चेहरे नाहीत का? हा संदेश जनतेत जाणे म्हणजे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांवर लागलेला बट्टा आहे. नवे नेतृत्व यांचे स्वागत आहे परंतु आजच्या स्थितीत नव्या नेतृत्वाच्या जोडीला पक्षाची घडी विस्कळीत होणार नाही यासाठी जे अनुभवी चेहरे आहेत त्यांना संधी देणे आवश्यक आहे.

बंडाळीमुळे शिवसेना ही नेत्यांची नसून सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे, ही भावना वाढीस लागली आहे. त्यास खतपाणी घालून शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट करणे आवश्यक आहे. एखादे पद देताना शिवसैनिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, यापेक्षा पक्षाशी एकनिष्ठ आहे का? स्वर्गीय बाळासाहेब यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक आहे का? जनसंपर्क, सामाजिक प्रतिष्ठा, समाजकार्य हे निकष ठेवणे आवश्यक आहे. इतर पक्षातून आलेल्या लोकांचा जरूर विचार करा, परंतु वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून शिवसेनेच्या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या शिवसैनिकांचा उचित सन्मान करणे देखील आवश्यक आहे, अशा शब्दांत सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना मिलिंद चव्हाण यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com