शिवसेनेच्या हॉटेलमध्ये भाजपची घुसखोरी; चाल ओळखत ठाकरेंनी आमदारांचा मुक्काम बदलला

Shivsena | BJP | Rajya sabha | : सर्वपक्षांचे रिसॉर्ट पॉसिटीक्स सुरु
Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
Uddhav Thackeray|Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : राज्यात राज्यसभा (Rajya sabha) निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यासाठी आता सर्वपक्षांचे रिसॉर्ट पॉसिटीक्स देखील सुरु झाले आहे. अशातच शिवसेना (Shivsena) आमदारांचा मुक्काम ठरलेल्या 'ट्रायडंट'मध्ये भाजप (BJP) नेत्यांची घुसखोरी होण्याची कुणकूण कानावर येताच शिवसेनेच्या पोटात गोळा आला असून, भाजपची चाल ओळखत शिवसेनेने आमदारांसाठीचे ट्रायडंटचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर आता मडमधील रिट्रीटमध्ये आमदारांना ठेवण्याची तयारी शिवसेनेने शनिवारी केली. (Rajya sabha election latest news)

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार देऊन तो निवडून आणण्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अखेर ठाम राहिले आणि आपापले उमेदवार रिंगणात ठेवले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या; तरीही भाजपने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, गेल्या अडीच पावणे-तीन वर्षापासून ठाकरे सरकारला पाडण्याच्या इरादा केलेल्या भाजपकडून या निवडणुकीत आमदार फोडले जाऊ शकतात, अशी भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे या काळात आपल्या आमदार नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.

त्यानुसार येत्या ८ ते १० जून हे तीन दिवस आमदारांना मुंबईत बोलाविण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची व्यवस्था 'ट्रायडंट' मध्ये करण्यात आली होती. त्यासाठीचे बुकिंगही करण्यात आले होते. मात्र, याच हॉटेलमध्ये भाजपचे आमदार राहणार असल्याची बातमी ठाकरेंच्या कानावर आली. त्यातून सावध झालेल्या शिवसेनेच्या इतर नेत्यांनी बैठका घेत, आपली व्यूहरचना बदलली. अर्थात, भाजप आमदार राहणारे ठिकाण नकोच असे सांगून, आपल्या आमदारांना 'रिट्रीट'मध्ये ठेवण्याच्यादृष्टीने तयारी केल्याचे समजते. त्याकरिताच आधीचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे.

दुसरीकडे, आपल्या आमदारांना बंद करून ठेवणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले होते. मात्र, भाजप आमदारांनाही एकत्र ठेवण्याचा निर्णय जवळपास निश्चित असून, त्यासाठी भाजप नेत्यांनी ट्रायडंटला पसंती दिली आहे. या ठिकाणी धोका होण्याच्या शक्यतेने शिवसेनेने आमदारांसाठीचे ट्रायडंटचे बुकिंग रद्द केले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या जागेवर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरविल्यानंतर भाजनेही माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत मदत करण्याची शब्द देत, राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेण्याची विनवणी या तिघा नेत्यांनी फडणवीस यांना केली. मात्र ही वाटाघाटी यशस्वी होवू शकली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com