मला कॅन्सर झाला, पण नेतृत्वाने साधी चौकशीही केली नाही : बंडखोर यामिनी जाधवांची खदखद

Yamini Jadhav | Shivsena | Eknath Shinde : नेतृत्व भेटत नाही, वेळ देत नसल्याची आमदारांची खदखद
मला कॅन्सर झाला, पण नेतृत्वाने साधी चौकशीही केली नाही : बंडखोर यामिनी जाधवांची खदखद

मुंबई : शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या (Shivsena) आता ३८ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. अपक्षांना धरुन हा आकडा ४६ पर्यंत जातो. पहिल्या दिवशी त्यांच्यासोबत केवळ १८ आमदार होते, मात्र हळू हळू हा आकडा वाढत आहे. यातील प्रत्येक आमदाराने थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दुर्लक्ष केल्याचे, आमदारांना वेळ न दिल्याचे आरोप करत आपली खदखद बाहेर काढत आहे. या दरम्यान बंडखोर आमदार यामिनी जाधव यांनीही पक्षनेतृत्वावर हल्लाबोल करत आपली खदखद बोलून दाखविली आहे.

काय म्हणाल्या आमदार यामिनी जाधव?

गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. कारण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, यापुढेही शिवसैनिक राहणार आहोत, किंबहुना हे जग आम्ही शिवसैनिक म्हणूनच सोडणार आहोत. माझे पती यशवंत जाधव हे तर ४३ वर्षांपासून शिवसेनेत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षींपासून शिवसैनिक आहेत. अनेकदा अडचणी आल्या, आर्थिक संकटं आली, निवडणुका हराव्या लागल्या. मात्र कधीही त्यांनी पक्षाबाबत वेगळा विचार केला नव्हता.

मागील ऑक्टोबर महिन्यापासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं एक वादळ आलं. ज्यावेळी आम्हाला समजलं, त्यावेळी संपूर्ण कुटूंब तुटले. या आजाराची माहिती पक्षाच्या प्रमुख नेत्यांना यशवंत जाधव यांनी दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती, की माझ्या घरी काही नेते येतील, आपल्या पक्षाच्या एका महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत, हीच गोष्ट मोठी हदरवणारी होती. मी स्वतः कॅन्सर या शब्दाने कोलमडून गेली होती. पण अशा परिस्थितीमध्ये माझ्या भायखळा मतदारसंघातील जनतेने, शिवसैनिकांनी खूप साथ दिली, मी आजही त्यांची आभारी आहे.

अपेक्षा होती, की विचारपूस केली जाईल, एक आधाराची थाप यशवंत जाधव अन् यामिनी जाधव यांच्या कुटूंबाला मिळेल. पण तसं काही झालं नाही. काही ठराविक लोकं, जसं किशोरीताई माझ्या घरी आल्या. दोन तास बसल्या. अनेक कॅन्सरशी संबंधित सुचना त्यांनी दिल्या, अध्यात्मिक सुचना दिल्या, आधार दिला. हे करं तुला बरं वाटेल, असं सांगितले. पण ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यापैकी कोणीही अगदी कोणीही भेटायला आले नाही. मी स्वतः २०१२ पासून नगरसेविका आहे. बऱ्याच आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाला, त्यांना भेटायला पक्षाचे नेते हॉस्पिटलमध्ये गेल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. मग त्यांच्याप्रमाणे मी देखील मरणासन्न अवस्थेमध्ये गेल्यानंतर माझ्या पक्षातील नेते मला आधार द्यायला येणार होते का? ही गोष्ट मनाला खलत होती.

याशिवाय मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अडचणींमधून माझे कुटूंब जात आहे. त्यातही कोणी आधार, कोणाचे मार्गदर्शन, कोणाच्या चांगल्या सुचना आम्हाला मिळाल्या नाहीत. दोघेचं कुटूंबासाठी हात-पाय मारत राहिलो, आणि मग या निर्णयापर्यंत पोहचलो. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. बऱ्याच दिवसांपासून याची प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होत आहेत. पण एक मात्र नक्की यशंवत जाधव आणि यामिनी जाधव यांनी शिवसेना सोडून दुसरा कोणताही जॉईन केलेला नाही. कॅन्सरच्या ज्या अवस्थेमध्ये भायखळा विधानसभेने जे आम्हाला समजून घेतले, किंबहुना भायखळा विधानसभेचा इतिहासच शिवसैनिकांनी घडवलेला आहे. त्याच शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बेईमानी करणार नाहीत. काहीतरी कारण त्यामागे असेल, हे शोधण्याची आज गरज आहे, असे म्हणतं त्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला समजून घ्यावे असे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com