'आनंद दिघे अन् ....' : राजन विचारेंचा राजकीय मार्ग ठरला; गुरुपौर्णिमेदिवशी भूमिका स्पष्ट

Rajan Vichare | Shivsena | Uddhav Thackeray : आमच्या सारख्या शिवसैनिकांची साथ कायम आपल्या सोबत असल्याची ग्वाही
Rajan Vichare
Rajan Vichare Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील (Shivsena) तब्बल ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर काही खासदार देखील त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, नाशिक, मुंबईमधील नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र या सगळ्यात एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या भूमिकेबाबत स्पष्टता येत नव्हती. मात्र आज गुरुपौर्णिमा या पवित्र दिवशी विचारे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली. (Rajan Vichare Clears his politicas stand)

आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुंची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. आजच्या दिवशी विचारे यांनीही त्यांचे पहिले गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. आज समाजात वावरताना साहेबांचा आशीर्वाद व शिकवणीची शिदोरी घेऊनच मी काम करीत आहे, आणि यापुढे देखील करित राहील, अशी ग्वाही देत त्यांनी आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेतले.

यानंतर विचारे यांनी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर जाऊन हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज आणि भगव्याचाच विचार मनामनात रुजविणारे बाळासाहेब ठाकरे केवळ माझ्यासाठीच नव्हे तर तमाम शिवसैनिक आणि महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत, अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर खासदार विचारे यांनी थेट मातोश्री गाठले आणि गुरुपौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विचारे यांनी ठाकरे यांना आमच्या सारख्या शिवसैनिकांची साथ कायम आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली. यातून विचारे यांनी आजच्या दिवशी एकप्रकारे आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in