कोणीही ऐरेगैरे उठतात अन् पोलिसांवर हात टाकतात...बघे कसे थंड बसतात?

मुंबईत पोलिसाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी संजय राऊत पोलिसांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.
shivsena leder sanjay raut condemns attack on mahrashtra police
shivsena leder sanjay raut condemns attack on mahrashtra police

मुंबई : काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे पोलिसांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. पोलिसांवर अशा प्रकारे हात टाकणाऱ्यांवर समाजानेच बहिष्कार टाकायला हवा, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी सादविका रमाकांत तिवारी (वय 30, रा. मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउददीन खान (26, रा. भेंडी बाजार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ पारठे हे कर्तव्य बजावत असताना सादविका या महिलेसोबत एक व्यक्ती होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करून वाहतूक हवालदार पारठे यांना मारहाण केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत महिला ही वाहतूक पोलिसाने शिवी दिल्याचा दावा करत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांला मारहाण केली. पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले आहे. महिलेला कोणत्याही प्रकारची शिवी दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पारठे यांना मारहाण व शिवीगाळ होत असताना त्यांनी दाखवलेल्या संयमाचे सहपोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी कौतुक केले. 

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपींना तुरुंगात पाठवण्याआधी त्या ठिकाणी जे बघे होते त्यांनी थंड बसता कामा नये. आपल्यासाठी हुतात्मा होणाऱ्या पोलिसांवर कोणी तरी ऐरेगैरे हात टाकतात, कोणी तरी नटी उठते आणि त्यांना माफिया म्हणते आणि आपण सर्वजण सहन करतो. आज त्यांच्यावर जरी कारवाई झाली असली तरी समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे

आजच्या प्रकरणातील आरोपींची नावे विशिष्ट जाती आणि धर्माची नाहीत. सरकारने आजच्या प्रकरणात ताबडतोब अर्ध्या तासात कारवाई केली आहे. डॉक्टरांवर हल्ले झाले तर कायदा केला जातो आणि पोलिसांवर हल्ला होतो तेव्हा आपण थंडपणे पाहतो, असे राऊत यांनी स्पष्ट केले.  

या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.  ते म्हणाले होते की, पोलिसांवर हात उचलणे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे याला सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करायला हवी. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com