बंडावेळी संजय शिरसाट आघाडीवर; सारखे विचारायचे कधी करणार? : मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

Eknath Shinde | Sanjay Shirsath | Shivsena : मध्यरात्री दीड वाजता संजय शिरसाट यांच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन
Eknath Shinde | Sanjay Shirsath
Eknath Shinde | Sanjay ShirsathSarkarnama

औरंगाबाद : शिंदे गटातील शिवसेना (Shivsena) आमदारांमध्ये मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन करण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे. दररोज एकतरी आमदार आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी नुकतेच शकडो समर्थकांसह मुंबई गाठत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर आपली ताकद दाखविली होती. त्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री शिंदेंसमोर शक्तिप्रदर्शन केले.

गुरूवारी मुंबईत मध्यरात्री दीड वाजता आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरसाट यांच्या प्रेमाखातर मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून शिंदे भारावून गेलेले पाहायला मिळाले. एका दिव्यांग कार्यकर्त्याचा मंचावर बोलावून मुख्यमंत्र्यांनी सत्कारही केला.

Eknath Shinde | Sanjay Shirsath
मोठी बातमी : मंत्रीमंडळाचा विस्तार होणार १९ जुलैला

या सर्व कार्यक्रमासाठी सुमारे ४ हजार शिरसाट समर्थक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. रवींद्र नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात "कार्यकर्त्यांचे हे प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसते" असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली. तसेच सध्या विरोधकांकडून सुरु टिकांना जोरात प्रतिउत्तरही दिले. शिवाय सत्तांतराच्या काळातील घडामोडींवर भाष्य करत नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्व ५० आमदार आपल्यासोबत स्वेच्छेने आले होते. त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. आमदारांना तिथं डांबून ठेवल्याचा दावा खासदार संजय राऊतांसह शिवसेनेतील काही नेत्यांकडून केला जात होता. पण हा दावा फेटाळून लावत, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांतच सगळं समोर दिसायला लागले होते. आमदारांचे अस्तित्व धोक्यात आल्याने ते माझ्यासोबत आले, असा दावा त्यांनी केला. त्यावेळी संजय शिरसाट आघाडीवर होते. कधी करणार, कधी करणार असे म्हणत होते. मी म्हटले, अरे थांबा जरा. त्याला वेळ यावी लागते, समोरच्याला संधी द्यावी लागते, असा खुलासा शिंदे यांनी केला.

आम्ही खूप प्रयत्न केले. ज्या शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणुका लढलो आणि गेल्या दहा-पंधरा दिवसांत आम्ही केले ते अडीच वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. पण दुर्देवाने झाले नाही. त्यावेळी आमचे हे चुकीचे सुरू आहे हेच म्हणणे होते. हे बदलायला हवे, असे अनेक जण म्हणत होते. सहा महिन्यांत कळाले की जे आपल्यासोबत आहेत ते बगलेमध्ये धरून मुंडी दाबायला लागले आहेत. ते आपल्याला संपवायला लागलेत. पराभूतांना ताकद द्यायला सुरू झाली. यापुढचा आमदार, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, असे म्हणत होते. मी चार-पाच वेळा प्रयत्न केले, यांना सोडा असे सांगत होतो. हे आपल्यासाठी घातक आहेत. मतदारांना आम्ही काय तोंड देणार, हे सांगत होतो, अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली.

कामाची यादी करा ; निधी औरंगाबादेत येऊन देतो

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमदार शिरसाट तसा निधी घेण्यात हुशार आहे. कायम मुंबईत दिसतो. मी त्याला नेहमी दम द्यायचो, मतदार संघात जातो का नाही? तेव्हा तो म्हणायचा सर्व ओके आहे. आज ही गर्दी पाहून दिसतंय की सर्व काही ओके आहे. औरंगाबादेत मोठा मेळावा ठेवा, मी येतो. तुम्ही कामांची यादी तयार ठेवा. तिथे येऊन घोषणा करतो. सर्व कामे होतील. चिंता करू नका अशी आश्वासनचं मुख्यमंत्री शिंदे यांनी शिरसाट समर्थकांना दिली.

असा ऐतिहासिक मेळावा झाला नसेल : एकनाथ शिंदे

पाऊस, ट्राफिक आणि औरंगाबाद ते मुंबई असा मोठा प्रवास करून आमदार शिरसाट यांचे हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. मध्यरात्री दीड वाजता मेळावा सुरु झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात कार्यकर्त्यांचे कौतुक केले. एवढा प्रवास करूनही सर्वजण उत्साही आहेत. ऐतिहासिक घटना आम्हीही केली आणि हा ऐतिहासिक मेळावा देखील आपण केला असे म्हणत त्यांनी शिरसाट समर्थकांचे आभार मानले. नाट्यगृहासह बाहेर देखील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती.

Eknath Shinde | Sanjay Shirsath
विधिमंडळ अधिवेशनाची तारीख बदलली; मंत्रिमंडळ विस्तारामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

मतदारांनी शिवसेना उभी केली : आ. संजय शिरसाट

मतदारांनी आपल्याला खऱ्या अर्थांने प्रेम दिले. त्यांच्या जीवावर आम्ही निवडून आलो आहोत. मतदारांनी शिवसेना मोठी केली आहे. काही लोक रोज टिव्हीवर बोलतात, त्यांना काय बोलावं हेच कळत नाही अशी टीका शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली. सुभाष देसाई यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर ते बघत देखील नव्हते. एखादेवेळेस निधी मागायला गेल्यानंतर दहा टक्के निधी मागत होते, अशी टीका सुभाष देसाई यांच्यावर केली.

एक जण रोज शरद पवार यांचे गुण गाण गात सुटले आहेत. पण रात्रीची सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मी रिक्षाचालक आमचे मुख्यमंत्रीही रिक्षाचालक, तुमच्याकडे इनकमिंग आहे. ही माणसे आउट-गोइंग आहेत. देणारे लोक आहेत. हेच आजच्या मोलाचे कारण आहे असे शिरसाट म्हणाले. ३८ वर्षांपासून शिवसेनेत आहे, बाळासाहेब होते त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार हरला, तर ते फक्त एक ग्लास दूध प्यायचे. पण आज काही लोक रोज सकाळी उठून शरद पवारांकडे जातात अशी टीका संजय शिरसाट यांनी राऊतांवरती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in