भाजप श्रीमंत पक्ष; पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने अन् हेलिकॅाप्टरचा वापर

पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Shivsena criticize BJP over Use of aircraft and helicopters to transport money
Shivsena criticize BJP over Use of aircraft and helicopters to transport money

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सातत्याने भाजपवर निशाणा साधला जात आहे. आजच्या अग्रलेखातही भाजपला मिळालेल्या तब्बल 750 कोटी रुपयांच्या देणग्यांवरून टीका करण्यात आली आहे. भाजप सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत (Election) पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला. पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकॅाप्टरचा वापर झाला, असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. (Shivsena criticize BJP over Use of aircraft and helicopters to transport money)

देशातील विविध राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या व निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या वापरावरही अग्रलेखातून निशाणा साधला आहे. सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. उमेदवार मालामाल असावे लागतात, तसे राजकीय पक्षही आपल्या परीने मालामाल होत असतात. फक्त एका वर्षात भाजपला 750 कोटी रुपयांच्या भरघो, देणग्या मिळाल्या आहेत. हा अधिकृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे! या काळात काँग्रेसला 139 कोटी मिळाले आहेत. राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत पक्ष दिसतोय. त्यांना 59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. 

भाजपचे भव्य देणगीदार

भाजपला लाभलेल्या भव्य देणगीदारांमध्ये अंबानी, अदानी, मित्तल, टाटा, बिर्ला ही हमखास नावे नाहीत. सगळ्या मोठे दानशूर फुडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्ट असून त्यांनी 217.75 कोटी रुपये भाजपला दान दिले आहेत. आयटीसी ग्रुपने 76 कोटी, जनकल्याण ट्रस्टने 45.95 कोटी, महाराष्ट्रातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनने 35 कोटी, लोढा डेव्हलपर्सने 21 कोटी असे मोठी आकडे आहेत. भाजपचा कारभार पाहता 750 कोटीच्या देणग्या म्हणजे झाडावरून गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील, अशी टीका करण्यात आली आहे.

लोकांचा पाठिंबा ही शिवसेनेची श्रीमंती

महाराष्ट्रातील शिवसेनेचे नाव श्रीमंतांच्या यादीत नाही व मोठ्या देणग्या शिवसेनेस मिळाल्याचे दिसत नाही, तरीही लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या पन्नास वर्षांपासून मैदानात लढतेच आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही अनेकांचा पराभव होतो तर अनेक फाटके उमेदवार पैशांचा गाजावाजा न करता श्रीमंतीचा पराभव करून विजयी होतात, असे नमूद करून शिवसेनेला किती देणग्या मिळाल्या याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. 

हे दुष्टचक्र भेदणे अशक्य

राजकारणात पैशांचा धूर निघणे हे आता नेहमीचेच झाले आहे. सत्ता आणि पैसा ही एक वेगळी नशा आहे. पैशांतून सत्ता, सत्तेतून पैसा. हे दुष्टचक्र भेदणे लोकशाहीत आता कुणालाही शक्य होईल असे वाटत नाही. उद्योगपती, बिल्डर्स, ठेकेदार, व्यापारी मंडळी कोट्यवधीच्या देणग्या एखाद्या राजकीय पक्षास देतात ते काय फक्त धर्मादाय म्हणून? या देणग्यांची वसुली पुढच्या काळात व्यवस्थित होतच असते. उद्योगपतींसाठी कायदे बदलले जातात, नियम वाकवले जातात व त्याने दिलेल्या देणग्यांची पुरेपुर वसुली त्यास करता येईल याचा बंदोबस्त केला जातो. इतिहास काळात निवडणुकांचे राजकारण नव्हते, पण युध्द लढण्यासाठी मोठ्या रकमा लागत, त्याची व्यवस्था सावकार मंडळी करीत किंवा सुरतसारखी लूट करून युध्दाचा खर्च भागवला जाई. आज निवडणुका हेच युध्द बनल्याने त्या युध्दासाठी हजारो कोटी रुपये गोळा केले जातात, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

750 कोटीवाल्या भाजपचा पराभव 

पैसा हाच राजकारणाचा आत्मा बनला आहे. देशाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची ही शोकांतिका आहे हे मान्य, पण हा पैशांचा खेळ यशस्वी होतो असेही नाही. श्रीमंत भाजपला पश्चिम बंगालची निवडणूक जिंकता आली नाही. आठ कोटी देणगीदाखल मिळालेल्या तृणमूल काँग्रेसने 750 कोटीवाल्या भाजपचा सहज पराभव केला. निवडणुका हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे. काळ्या पैशांचा धबधबा तेथेच वाहत ाहे. लोकशाही भ्रष्ट आहे म्हणून राज्य व्यवस्था भ्रष्ट होते. परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता. हा हजारो कोटींचा काळा पैसा परत आणू व देशाची भ्रष्ट अर्थव्यवस्था स्वच्छ करू, असे मोदींचे वचन होते म्हणून लोकांनी मतदान केल. तो काळा पैसा कधी आलाच नाही. तो काळा पैसा निवडणुकीत वाहतोच आहे. गंगेत प्रेते तरंगत आहेत. निवडणुकांत काळा पैसा वाहतो आहे. राजकारणात पैसात बोलतो आहे, अशी टीका करत मोदींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com