
Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शिवसेनेच्या वकिलांनी व्हीप बजावून कारवाई करणार नसल्याचा शब्द दिला होता. यानंतरही शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी रविवारी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला.
या व्हीपचे पालन केले नाहीतर दोन आठवड्यानंतर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावर आम्हाला व्हीप मिळाला नाही आणि मिळाला तरी तो पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २८) अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाला शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित रहावे, असा व्हीप प्रतोद भरत गोगावले यांनी बजावला होता.
भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, "धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या ५६ आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. तो त्यांना पाळावाच लागेल. व्हीप पाळला नाहीतर दोन आठवड्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल."
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही एकाच चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना व्हीपचे पालन करणे गरजेचे असते. अन्यथा कारवाई होते, असे सांगितले. मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही व्हीपचे उल्लंघन केले तर कारवाईचा इशारा दिला आहे.
शिवसेनेने बाजावलेला व्हीप आम्हाला मिळाला नाही, मिळाला तरी तो पाळणार नाही, असे म्हणत ठाकरे गटाकडून व्हीप धुडकावला आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) म्हणाले, "आम्हाला कोणालाही व्हीप मिळालेला नाही. आम्हाला शिवसेना (शिंदे गट) व्हीप बजावू शकत नाही. त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात व्हीप न बजावण्याचे मान्य केले होते. जर त्यांनी असे केले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल."
संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या व्हीपवरून सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयात सागूनही त्यांनी व्हीप काढला. हा न्यायालयाचा अवमान ठरत आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या मुद्द्यांमध्ये सामील केला जाईल. शिवसनेतून फुटलेले आमदार फुटीचे दररोज एकएक नवीन कारण देत आहेत. त्याची यादीही या सुनावणीवेळी दिली जाणार आहे."
आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही शिवेसेनेचा समाचार घेतला. ते म्हणाले, "व्हीपच्या माध्यमातून आम्हाला घाबरविण्याचे प्रयत्न करू नका. हा व्हीप म्हणजे कोबडी हुल आहे. त्या कोंबडी हुलला आम्ही घाबरत नसतो."
दरम्यान व्हीप बजावल्यानंतर तो पाळण्यासाठी सर्वांना बंधनकारक असल्याची जोरदार भूमिका शिवसेना घेत आहे. तर व्हीपचे पालन करणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाने स्पष्ट केली आहे. यामुळे मंगळवारी होणाऱ्या अधिवेशनात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.