
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) चांगलेच दुखावले असल्याचे दिसले. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांविषयी (Sharad Pawar) आदर असल्याचे सांगितले. आपल्या तोंडून चुकूनही अपशब्द निघाला असल्यास त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, असं त्यांनी जाहीर केलं. (Deepak Kesarkar Latest News)
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, मी ज्यावेळी वेगवेगळ्या मुलाखती दिल्या होत्या. त्यावेळी पवारसाहेबांचा त्यात उल्लेख होता. त्यांच्याबद्दल मी कधीही अनुद्गार काढले नाहीत. माझ्या जीवनाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द येऊ शकत नाहीत.
शिवसेनेतील फुटीबाबत मी जे बोललो ती वस्तुस्थिती होती. 2014 मध्ये आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी जेव्हा सरकार स्थापन झालं. त्यावेळीही पवारांनी आपली भूमिका जाहीर केली होती की, भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती. या घटनांचा आणि त्यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य करण्याचा काहीही संबंध नाही. माझ्या तोंडून त्यांच्याविषयी चुकून जरी अपशब्द निघाला असेल तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं केसरकर म्हणाले.
होय आव्हाड हेलिकॉप्टर घेऊन आले होते
ज्या आव्हाडांनी असं लिहिलं आहे की, ते मला भेटायला आले होते. ते हेलिकॉप्टर घेऊन आले होते, ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा, असं सांगायला आले होते. पवारांचा निरोप घेऊन ते आले नव्हते. पवार ज्यादिवशी सावंतवाडीला आले त्यावेळी मी माझा राजीनामा त्यांच्याकडे दिला. मी राणेंचा प्रचार करू शकत नाही, त्यामुळे मी आमदाराकीचा राजीनामा देतो, असं त्यांना पत्र होतं, असं केसरकरांनी सांगितलं.
हे केल्यानंतरही त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. पण ज्यावेळी ते सिंधुदुर्गमध्ये आले, त्यावेळी राष्ट्रवादीची मोठी सभा होती. मी एकमेव आमदार होतो. मी साहेबांचं स्वागत केलं. त्यांनी ते स्वागत स्वीकारलं. आव्हाड त्यांच्यासोबत होते. त्यांनी मला स्टेजवर येऊ नका, असा निरोप दिला. त्यानंतर मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही चुकून घडले असेल तर मी पवारांची दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही आवश्यकता असेल तर त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, असं केसरकरांनी जाहीर केलं.
काय म्हणाले होते आव्हाड?
आव्हाड यांनी केसरकरांवर ट्विटरवरून टीका केली होती. 'अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका,' असं आव्हाडांनी म्हटलं होतं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.